कसबे सुकेणे : चक्रधरस्वामींचे साहित्य हे सर्वात जुने आहे. या साहित्याने मराठी भाषेला समृद्ध केले असून, स्वामींनी त्याकाळीच आपल्या साहित्यातून समतेचा खरा संदेश दिला होता. स्वामींच्या अशा साहित्याचे बाजारीकरण व विडंबन होत असेल तर ते महानुभाव पंथीय कधीच सहन करणार नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे पूज्य मनोहरशास्त्री सुकेणेकर यांनी येथे केले.नाशिक जिल्हा महानुभाव समिती व इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बु।। येथील ग्रामस्थ व भाविकांच्या सहयोगातून जिल्हास्तरीय चक्रधर स्वामी जयंती उत्सव यंदा नांदगाव बु।। येथे संपन्न होत आहे. सोमवारी सकाळी सभामंडपाचे पूजन करून अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे परमपूज्य महंत मनोहरशास्त्री सुकेणेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. कवी रवींद्र मालुंजकर, जिल्हा महानुभाव समितीचे अध्यक्ष वामन आवारे यांनी परीक्षक म्हणून कामकाज केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महंत बाणेराज बाबा, पूज्य अर्जुनराज सुकेणेकर, बाळकृष्णराज सुकेणेकर, चक्रपाणी महाराज, गोपीराज शास्त्री, राजधरराज बाबा, ऋषिराज बाबा आदि मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी नांदगाव बु।।मधून श्रीकृष्णमूर्तीची भव्य मिरवणूक व महानुभाव संतांची शोभायात्रा काढण्यात आली. दोन दिवसांच्या या सोहळ्यात महानुभाव पंथातील राज्यभरातील प्रमुख महंत, संत व तपस्विनी व अभ्यासकांची या सोहळ्यास उपस्थिती लाभणार असून, शनिवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तसेच वर्धनस्त बीडकर बाबा रणाईचे यांच्या अध्यक्षतेखाली धर्मसभा होत आहे. याप्रसंगी महंत नागराज बाबा, प्रा. देवीदास गिरी यांची व्याख्याने तसेच गुणवंत गौरव, आमदार निर्मला गावित, आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते सभामंडप आणि ध्वजारोहण होणार आहे. खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, आमदार राजाभाऊ वाजे, अॅड. संदीप गुळवे आदिंसह इगतपुरी तालुक्यातील मान्यवर आणि जिल्ह्यातील महानुभाव पंथीय संत व भाविक या सोहळ्यात सहभागी होणार आहे. (वार्ताहर)
चक्र धर जयंती सोहळ्यास प्रारंभ
By admin | Published: September 02, 2016 10:08 PM