नाशिक महानगर परिवहन महामंडळाची बस सेवा येत्या २६ जानेवारीस म्हणजेच प्रजासत्ताक दिनापासून सुरू करण्यात येणार आहे. पाच टप्प्यांनतर ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार असली तरी पहिल्या टप्प्यासाठी तयारी सुरू असून पन्नास डिझेल बस रस्त्यावर येतील. नाशिकरोड आणि पंचवटी अशा दोन ठिकाणांहून नऊ मार्गांसाठी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आता तयारी अंतिम टप्प्यात आहे. गेल्या शुक्रवारी (दि.८) आयुक्त कैलास जाधव यांनी बस शेल्टरचे काम पीपीपीच्या माध्यमातून करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना तातडीने काम करण्यास सांगितले आहे. शहरात एकूण ७६२ ठिकाणी बस थांबे आणि शेल्टर असतील. त्यात ३०२ नव्या जागांवर पिकअपशेड किंवा शेल्टर उभारण्यात येणार असून ७१ जुन्या शेल्टरचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. तर ३८९ ठिकाणी पोल व्दारे थांबे असतील. महापालिका खासगी भागीदारीतून हे शेड तयार करणार असून जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न ठेकेदाराला मिळेल. त्यासाठी कोणत्याही प्रकारे महापालिकेला खर्च येणार नाही.
महापालिकेने १ जानेवारीपासून बस चाचणी करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, इंटीलीजन्स ट्राफीक मॅनेजमेंट सिस्टीम्ससह विविध प्रकारच्या सॉफ्टवेअरची चाचणी सुरू असून ती संपल्यानंतर मग बस रस्त्यावर आणून अन्य चाचण्या केल्या जातील. विशिष्ट वेळेत बस संबंधित थांब्यापर्यंत पोहोचते किंवा नाही तसेच आयटीएमएस सॉफ्टवेअरनुसार ही सेवा चालते किंवा नाही याची तपासणी करण्यात येणार हाेती. मात्र, सॉफ्टवेअरच्या चाचण्याच पूर्ण झाल्या नसल्याने अद्याप बस रस्त्यावर आणून चाचणी झालेली नाही. त्याला काही दिवस अवधी लागणार आहे.
इन्फो..
दिव्यांगासाठी सोपे शेल्टर
बस शेल्टरचे संपुर्ण डिझाईन महापालिकेने तयार करून ते ठेकेदार कंपनीस दिले आहे. त्यानुसार शेल्टर आरामदायी आणि दिव्यांगाना देखील वापरता येईल असे आहे. त्यावर बस केव्हा येणार आणि त्यासंदर्भातील तांत्रिक माहितीचे स्क्रेालींग असणार आहे. ते मात्र दुसरी कंपनी बसविणार आहे.