नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे साई ब्रम्हा कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शनिवार (दि.२२) पासून प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्ताने तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.साई ब्रम्हा कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून येथे साईबाबा मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. टाळ-मृदृंगाच्या गजरात व सजविलेल्या आकर्षक रथातून साईबाबांच्या मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक व शोभयात्रा काढण्यात आली. शोभयात्रेत गावातील महिला व ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. रविवार (दि. २३) रोजी पहाटे पाचपासून प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण स्वामी शिवानंदगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. सोमवार (दि. २४) रोजी सकाळी ९ वाजता ह. भ. प. विक्रम महाराज शिंदे यांचे किर्तन होणार आहे. त्यानतंर दुपारी बाराला महाप्रसदाचे वाटप केले जाणार आहे.
दोडीत साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 5:40 PM