देवळा : अक्षयतृतिये निमित्त देवळा येथे ग्रामदैवत दुर्गामातेच्या पालखीची शहरातून शोभायात्रा काढून उत्साहात यात्रोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. तीन दिवस चालणार्या या यात्रोत्सवास अक्षयतृतिया व यात्रोत्सवाचे औचित्य साधून सासरी असलेल्या सासरवाशीनी देवळा येथे आपल्या माहेरी येउन दुर्गामातेच्या चरणी नतमस्तक होतात. नुकत्याच लग्न झालेल्या तसेच आजी झालेल्या सासरवाशीणी देखील आतुरतेने यात्रोत्सवाची वाट पहात असतात. शहरातील नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी वास्तव्यास असलेले चाकरमाने सहकुटुंब यात्रोत्सवास दरवर्षी आवर्जुन उपस्थित राहतात व यात्रेचा आनंद लुटतात.दुर्गामाता मंदीराचे बांधकाम दक्षिणात्य गोपुर शैलीचे असून उत्तर महाराष्ट्रातील हे एकमेव देवी पंचायतन मंदीर आहे. देवी पंचायतन म्हणजे मध्यभागी मुख्य देवीची मूर्ती, तिच्या इशान्य दिशेला शिव, आग्नेय दिशेला विष्णू, नैऋत्य दिशेला सुर्यनारायण, व वायव्य दिशेला गणेश मंदीर अशी ही पंचक रचना मंदीरात केलेली आहे. वर्षभरात शाखंभरी पौर्णिमा उत्सव, अक्षय तृतिया यात्रा व नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. ह्या उत्सवांना भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत असल्याने मंदीराचा परिसर गजबजू लागला. यामुळे मंदीर परीसराचा विकास करण्याची आवश्यकता निर्माण झाली.
देवळ्यात दुर्गामाता यात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 1:59 PM