कसबे सुकेणे : परमेश्वर साधकानी केलेली पदयात्रा ही आत्मपरीक्षणाचा पवित्र आरसा असल्याचे प्रतिपादन आचार्यप्रवर महंत सुकेणेकरबाबा यांनी केले.श्री दत्त मंदिर संस्थान, मौजे सुकेणे व नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात पूज्य गोपीराज शास्त्री सुकेणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित महानुभावपंथीय स्थान दर्शन व समाजप्रबोधन पदयात्रेच्या प्रारंभाप्रसंगी महंत मनोहरशास्त्री सुकेणेकर बोलत होते. श्रीक्षेत्र मौजे सुकेणे दत्त मंदिरातून या यात्रेचे प्रस्थान नगरकडे झाले आहे. ही समाजप्रबोधन यात्रा चक्र धर स्वामींच्या विविध ठिकाणांच्या चरणांकित स्थानांना भेट व वंदन करीत या मार्गावर सत्य, अहिंसा, व्यसनमुक्तीचा संदेश देत महानुभावपंथीय साहित्य व विचारांचे प्रबोधन करणार आहे. सोनई, नागापूर, लोणी, पारनेर, कामरगाव, आरणगाव, भिंगार, वनदेव, भिंगार, मिरजगाव, घोगरगाव, लिंबा अशा एकूण ९४ चरणांकित स्थानांना भेटी देणार असून, १८ दिवसांचा प्रवास ३५० किलोमीटर पायी भ्रमण करणार आहे. सुकेणे परिसरासह जिल्ह्यातील सुमारे दोनशे भाविक या पदयात्रेत सहभागी झाले आहेत.गोपीराज शास्त्री सुकेणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या यात्रेत अर्जुनराज सुकेणेकर, बाळकृष्णराज सुकेणेकर, राजधरराज सुकेणेकर, श्रीधरानंद सुकेणेकर या संतांचा सहभाग आहे. पदयात्रेचे नाशिक व नगर जिल्ह्यातील विविध मठ व मंदिरात भाविक स्वागत करीत आहे.
महानुभावपंथीय समाजप्रबोधन यात्रेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 6:21 PM