नाशिक : पोलिओप्रमाणेच देशातून गोवर आणि रुबेला यांचेही उच्चाटन व्हावे यासाठी आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून मंगळवार (दि़२७) पासून या मोहिमेस प्रारंभ झाला़ जिल्हा रुग्णालयात या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी़ यांच्या हस्ते करण्यात आला़ जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ़ नरेश गिते, आरोग्य उपसंचालक डॉ़ रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकिसक डॉ़ सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ विजय डेकाटे तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ़ अनंत पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकिसक डॉ़ निखिल सैंदाणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले़ दरम्यान, पहिल्या दिवशी जिल्ह्यातील हजारो बालकांचे लसीकरण करण्यात आले़जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी यावेळी सांगितले की, गोवर-रुबेला या आजारांमुळे मुलांमध्ये कायमचा आंधळेपणा, बहिरेपणा तसेच मतिमंदता निर्माण होते़ या लसीकरणामुळे या दोन्ही आजारांपासून मुलांची मुक्तता होणार आहे़ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ जगदाळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाडी व माध्यमिक शाळेतील ९ महिने ते १५ वर्ष वयोगटांतील सर्व बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे, तर उपसंचालक डॉ़ रत्ना रावखंडे यांनी या माहिमेत आरोग्य विभाग १९ लाख २३ हजार मुलांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले़शासनाने गोवर-रुबेला ही लस पहिल्या पंधरा दिवसांमध्ये सर्व शाळांमधून देण्याचे नियोजन केले असून प्रत्येक शाळेसाठी लसीकरणाचा दिनांक निश्चित करण्यात आला आहे़ देशभरात आतापर्यंत ९ कोटी ६० लाख मुलांना ही लस देण्यात आली आहे़ नाशिक जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून या लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला असून, पाच आठवडे ही मोहीम राबविली जाणार आहे़ यावेळी मुलांना गोवर-रुबेला लस देण्यात आली तसेच मान्यवरांचे हस्ते मुलांना गोवर-रुबेला लस दिल्याचे ‘शासनाची प्रमाणपत्रे ’ देण्यात आले़ यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही़ डी़ पाटील, जि. प. उपमुख्यकार्यकारी अधिकारी(महिला बालकल्याण) मुंडे, जिल्हा माताबालसंगोपन अधिकारी डॉ़ चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ साळवे, जागतिक आरोग्य संघटना प्रतिनिधी डॉ़ कमलाकर लष्करे, आरोग्य सहायक संचालक डॉ़ पट्टनशेट्टी, अधिसेविका मानिनी देशमुख आदी उपस्थित होते़जिल्ह्यात लसीकरणाची तयारी पूर्णनाशिक जिल्ह्यात १९ लाख २३ हजार ९७० बालकांना ही लस देण्यात येणार असून, महानगरपालिका क्षेत्रात १ लाख ९३ हजार २२२, नाशिक ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात ११ लाख ४० हजार ४८८ लाभार्थी बालके असून त्यांना या मोहिमेचा लाभ मिळणार आहे़ यासाठी नाशिक जिल्ह्यातील ५ हजार ५०४ ग्रामीण शाळेत, तसेच ३ हजार ३२० बाह्य संपर्क सत्र, २१९ जोखीमग्रस्त भाग, ३ हजार ८८० संस्थेतील लसीकरण सत्र असे एकूण १२ हजार ९२३ ठिकाणी हे लसीकरण राबविण्यात येणार आहे़
गोवर-रुबेला लसीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:37 AM