कसबे सुकेणे : गोविंद.. गोविंद.. च्या गजरात जिल्ह्यातील महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील दत्त मंदिरात पविते पर्व काळास प्रारंभ झाला. मंदिरातील चक्रधर स्वामींच्या चरणांकित स्थानाला पविते करण्यासाठी राज्यभरातील व जिल्ह्यातील भाविकांची मांदियाळी भरली आहे.महानुभाव पंथात पविते पर्व काळास महत्त्व आहे. गुरुपूजनाचे महत्त्व असलेल्या या पर्वाचा श्रीक्षेत्र मौजे सुकेणे दत्त मंदिरात प्रारंभ झाला आहे. ‘गोविंद.. गोविंद’च्या नामघोषात भाविकांनी देवास विडा अवसर आणि गुंफलेले नारळ-सुपारी अर्पण करीत पविते केले. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या पर्व काळात शेकडो भाविक सहभागी होत देवाला सुताने गुंफलेले व आकर्षक सजविलेले नारळ अपर्ण करतात त्यास विडा अवसर म्हणतात. मंदिर परिसर जयघोषाने दुमदुमन गेला होता. श्रावण पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा विधी होत असतो. याप्रसंगी आचार्य प्रवर महंत सुकेणेकर बाबा, बाळकृष्णराज सुकेणेकर, अर्जुनराज सुकेणेकर, गोपीराजशास्त्री सुकेणेकर, भीमराज दादा सुकेणेकर, राजधरराज सुकेणेकर, दत्तराज सुकेणेकर, तपस्विनी महंत सुभद्राबाई सुकेणेकर आदींसह मौजे सुकेणे, कसबे सुकेणे, चांदोरी, ओझर, पिंपळगाव, दिंडोरी, सिन्नर येथील महंत उपस्थित होते. दरवर्षी नारळी पौर्णिमेला तसेच चतुर्दशीला महानुभाव पंथात पविते पर्व घरोघरी धार्मिक उत्सवाने साजरा करण्यात येतो. भगवान श्रीकृष्ण तथा पंचावतारांना सुताने गुंफलेल्या नारळाचे पविते अपर्ण करण्यात येते. जन्माष्टमीपर्यंत हा उत्सव तथा विधी सुरू असतो. यानिमित्त नारळी पौर्णिमेपासून ते जन्माष्टमीपर्यंत मंदिरात आणि आश्रमात आकर्षक सजावट करण्यात येते. तसेच उटी, उपहार, पूजा, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्र म होतात. घरोघरी देवघराची सजावट आणि आरास करण्यात येते. नाशिक जिल्ह्यातील विविध महानुभाव पंथीय मठ-मंदिरे, आश्रमात हा उत्सव साजरा केला जातो.
पविते पर्व सोहळ्यास प्रारंभ पविते पर्व सोहळ्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 11:49 PM