----
गिरणापात्रातून अवैध वाळू उपसा
मालेगाव : शहरालगतच्या टेहरे - सोयगाव फाट्याजवळील गिरणा नदीपात्रातून बैलगाडी व ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू उपसा केला जात आहे. या उपसाकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. दिवसाढवळ्या गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा केला जात आहे. वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल विभागाने कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
----
बाजारपेठेत गर्दी वाढली
मालेगाव : कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर मालेगावच्या बाजारपेठेत कसमादे परिसरातील नागरिकांनी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. मात्र, ही गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी ठरत आहे. बहुतांश दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून येत आहे. काही नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत.
----
इंधन दरवाढीने सर्वसामान्य हैराण
मालेगाव : इंधनाचे दराने शंभरी पार केली आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोल व डिझेलच्या किमतीत दिवसागणिक वाढ होत आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गाला बसत आहे. वाहतुकीचे दर वाढले आहेत. परिणामी बाजारपेठेतील दुकानांमधील वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. केंद्र शासनाने इंधनाच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
----
रस्ता दुरुस्तीची मागणी
मालेगाव : शहरालगतच्या टेहरे फाटा ते दाभाडी गावादरम्यानच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. चिंतामणी गणपती मंदिराजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागतात. या रस्त्यालगत हॉटेल्स, शेतीपूरक वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. वर्दळीच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.