लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : तालुक्याच्या काही भागात मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीस प्रारंभ केला आहे. परंतु जिल्हा बँकेचे व्यवहार ठप्प असल्याने बियाणे व खतांच्या खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकरी मात्र मेटाकुटीस आले असून, शासनाने नुकतेच खरिपासाठी शेतकऱ्यांना जाहीर केलेले १० हजार रु पये लवकर मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.बहुसंख्य शेतकरी हे जिल्हा बँकेचे खातेदार आहेत. त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार या खात्यावर होत असतात. अनेक नियमित कर्जदार शेतकऱ्यांनी कर्ज माफ होण्याची वाट न पाहता सोसायटीकडून घेतलेल्या पीककर्जाचा भरणा जिल्हा बँकेत केला आहे. जिल्हा बँकेचे व्यवहार सध्या ठप्प असल्याने या शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळालेले नाही. नुकतीच शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्यामुळे ज्यांनी नियमित कर्जाचा भरणा केला असे कर्जदार शेतकरी पश्चात्ताप व्यक्त करीत आहेत. सन २००८ मध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना केलेल्या संपूर्ण कर्जमाफी योजनेत नियमित कर्जदार शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळाला नव्हता. यामुळे हे नियमित कर्जदार शेतकरी चिंतेत पडले आहेत.जिल्हा बँकेचे खातेदार असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरील उलाढाल ही थांबलेली आहे. खरीप हंगामात पीक लागवडीसाठी लागणारे बी, बियाणे व खते खरेदी करण्यासाठी या शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेतील खात्यावर पैसे असूनही बँकेतून पैसे मिळत नसल्यामुळे त्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे हे शेतकरी त्रस्त झाले आहेत. उधारीत बी-बियाणे मिळावे यासाठी बियाणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची मिनतवारी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. चालू खरीप हंगाम सुरळीत पार पडण्यासाठी शासनाने जाहीर केल्याप्रमाणे १० हजार रु पये पीककर्ज त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
खरिपाच्या पेरणीला प्रारंभ
By admin | Published: June 15, 2017 12:14 AM