सुरगाणा : तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या दुर्गम भागातील खुंटविहीर येथून नाशिकला जाण्यासाठी बससेवा सुरू झाल्याने या परिसरासह गुजरातमधील नागरिकांनादेखील या सेवेचा लाभ होणार असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेला दुर्गम, अतिदुर्गम भागातील दळणवळणाची वाहिनी म्हटले जाते; मात्र गुजरात सीमेलगतच्या काही गावांमध्ये बसचे दर्शन अद्यापही झालेले नाही. तालुक्यातील राशा, खिर्डी, भाटी, खडकी, मधुरी, उदमाळ, तोरणडोंगरी, सुळे, वांगण अशा अनेक गावांमध्ये बसचे दर्शन अद्यापही झालेले नाही. गुजरातच्या सीमेवरील गावात गुजरात शासनाने खेडोपाडी बस वाहतुकीचे जाळे पसरविले आहे. तालुक्यातील अशाच खुंटविहीर व परिसरातील नागरिकांसाठी थेट जिल्ह्याशी संपर्काकरिता एकविसावे शतक उजाडावे लागले आहे. या पंचक्र ोशीतील पंधरा ते वीस गावे येतात. यामध्ये पिंपळसोंड, मालगोंदा, गोणदगड, उदालदरी, बर्डा, चिंचमाळ, गाळबारी अशी गावे येतात. या गावांमध्ये अद्यापही बससेवा उपलब्ध नाही. त्यामुळे नाशिक येथे जाण्यासाठी दहा ते पंधरा किलोमीटर अंतर पायपीट करून आंबाठा येथे जावे लागत असे. यावेळी खुंटविहीरच्या सरपंच यमुनाबाई झिरवाळ, रामजी पवारआनंदा झिरवाळ, चिंतामण गावित, बाळू झिरवाळ, रामदास गवळी, वसंत झिरवाळ, शैलेश राऊत, श्रीराम झिरवाळ, रामा झिरवाळ, मुरली गवळी, सीताराम कुवर, रामा गवळी, अंबादास राऊत, लक्ष्मण चौधरी, रामजी पवार, काळगा राऊत, साधुराम देवळे, सुभाष थोरात आदी उपस्थित होते.एकीकडे मेट्रो सेवेचा आनंदोत्सव साजरा केला जातो तर दुसरीकडे अद्यापही अनेक गावे बससेवेपासून दुर्लक्षित आहेत. हा विरोधाभास संपणार केव्हा? पहिल्याच दिवशी फुलांचे हार, पताका, तोरण, केळीचे खांब, नारळाच्या झावळ्या बांधून तसेच चालक, वाहकाला ओवाळून सत्कार झाला. बसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
खुंटविहीर ते नाशिक बससेवेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 6:21 PM