पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस परिसरात आज वसूबारस दिन दिन दिवाळी गाई.. म्हशी ओवाळी असे म्हणत, गाय-वासराचे पूजन करून दीपोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. ग्रामीण भागात वसूबारसेच्या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते. परिसरातील शेतकरी, आदिवासी, कष्टकरी कुटुंबातील सदस्यांकडून आज दिवसभरात गाय -वासराचे पूजन करून त्यांना शेतात आलेले बाजरीचे कणीस खाऊ घालून गोड नेवैद्य देण्याची प्रथा आहे. दिवाळीच्या पाच दिवसातील पहिला सण वसूबारसपासून महिलावर्ग फराळ बनविण्याच्या लगबगीत असतात. सासुरवाशी महिलांना दिवाळीसाठी मूळ लावणारे भाऊ हे मूळ लावून जात असतात. या दिवसापासून ग्रामीण भागातील संपूर्ण वातावरण हे आनंदी व उल्हासदायी पहावयास मिळते. आदिवासी बांधव, कष्टकरी - शेतमजूर या दिवसापासून सणाला सुरुवात करतात. मोठ्या आर्थिक कोंडीत सापडला आहे. यावर्षी शेतकऱ्याच्या कुठल्याही शेतमालाला बाजारभाव मिळाला नसून परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळेच फक्त बळीराजा आपले मनोधेर्य टिकून आहे. एवढ्या कठीण परिस्थितीतही दिवाळीच्या या लगबगीत शेतकरी व त्याचे कुटुंब आनंदी दिसून येत आहे. वसूबारसेच्या दिवशी तेहतीस कोटी देव सामावलेल्या गोमातेचे पूजन करण्यात आले व शेतकरी बांधवाना व त्याच्या कुटुंबीयांना सुखी ठेवण्याची प्रार्थना गोमातेकडे करण्यात येऊन दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ केला. (वार्ताहर)
प्रकाशपर्वास प्रारंभ
By admin | Published: October 26, 2016 10:50 PM