नाशिकरोड : देवळालीगावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सवास शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. दिवसभर हजारो भाविक, महिलांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळनंतर रात्री ११ वाजेपर्यंत संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेला होता. श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त शनिवारी पहाटे कृष्णा-किशोरी देशमुख, संपत-दुर्गा खोले यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. सत्यनारायण पूजा हेमंत-कविता गोसावी यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी ९ वाजता परंपरेनुसार देवळालीगाव आठवडे बाजारातून वाजत-गाजत मांडव डहाळ्यांची मिरवणूक मंदिरापर्यंत काढण्यात आली होती. मांडव डहाळ्याची पूजा सागर गोसावी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर त्र्यंबकबाबा भगत, विजयनाथ भोई, आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. महाआरतीनंतर पंचकमिटीच्या वतीने सामाजिक-राजकीय आदि विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांचा फेटा बांधून स्वागत व सत्कार करण्यात आला. तसेच पंचकमिटीच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, सत्यभामा गाडेकर, सरोज आहिरे, सुनीता कोठुळे आदिंचा सत्कार करण्यात आला. सकाळी ११ वाजेपासून मंदिरामध्ये नैवेद्य दाखविण्यासाठी परिसरातील महिला, नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी वाजत-गाजत तकदराव मिरवणूक काढण्यात आली होती. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. दुपारी ४ वाजेनंतर देवळाली कॅम्पला जाणारी व येणारी वाहतूक सत्कार पॉइंट सुभाषरोड, मालधक्का मार्गे वळविण्यात आली होती. सायंकाळपासून यात्रेला भाविकांची सहपरिवार मोठी गर्दी झाल्याने रात्री ११ वाजेपर्यंत संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेला होता.यावेळी पंचकमिटी अध्यक्ष अॅड. शांताराम बापू कदम, बाळनाथ सरोदे, रुंजा पाटोळे, शिवाजी लवटे, राजेंद्र गायकवाड, पुंडलिक खोले, लहानू चव्हाण, प्रमोद बुवा, महेश देशमुख, त्र्यंबकनाथ बुवा, नारायण थोरात, सूर्यभान घाडगे, सुकदेव गायकवाड, दगू खोले, संतोष खोले, दत्तात्रय सहाणे, सुधाकर जाधव, मनोहर कोरडे, किशोर जाचक, श्याम खोले आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. यात्रेत खेळणी, खाद्यपदार्थ, शोभिवंत वस्तू, रहाट पाळणे तसेच विविध प्रकारचे स्टॉल्स थाटण्यात आले होते. (प्रतिनिधी)
म्हसोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ
By admin | Published: March 05, 2017 1:39 AM