नाशिक : बेलासारख्या औषधी वनस्पतीची अधिकाधिक लागवड व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून आजपासून बेल महोत्सवात राबविण्यास प्रारंभ झाला असून, पुष्पप्रदर्शनात भेट देणाऱ्यांना बेलाची रोपे वाटप करण्यात आली.महापालिकेच्या उद्यान विभागाचे ब्रॅँड अॅम्बेसेडर सह्याद्री देवराईकार अभिनेते सयाजी शिंदे यांची ही संकल्पना आहे. सणाच्या निमित्ताने विविध वनस्पतींची लागवड करावी यासाठी त्यांनी बेल महोत्सवाची संकल्पना मांडण्यात आली होती. मात्र, श्रावणात काही अडचणींमुळे बेल महोत्सव साजरा करता आला नव्हता. मात्र, आता महाशिवरात्रीचे औचित्य साधून भगवान शंकराला प्रिय असलेल्या बेल रोपांचे वाटप करण्यास प्रारंभ झाला आहे. एकूण तीन हजार रोपांचे वाटप येत्या तीन दिवसांत करण्यात येणार आहे.मनपाचे आयुक्त तथा अध्यक्ष वृक्ष प्राधिकरण समिती राधाकृष्ण गमे व भारती गमे यांच्या शुभहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना बेलाची रोपे वाटप करण्यात आली. यावेळी कार्यक्र मास वृक्ष प्राधिकरण सदस्य श्यामकुमार साबळे, पुंडलिक गिते, नगरसेवक सुनील गोडसे, शिवाजी आमले, कार्यकारी अभियंता महेश तिवारी आदी उपस्थित होते. विभागात राका कॉलनी उद्यान, कृषिनगर जॉगिंग ट्रॅक, नवीन नाशिक विभागात गणेश चौक बाल उद्यान, संत गाडगे महाराज उद्यान, पाटीलनगर, स्वामी विवेकानंद नगर उद्यान, सातपूर विभागात काळेनगर जॉगिंग ट्रॅक, राज्य कर्मचारी वसाहत उद्यान आदी विभागात रोपे वाटप करण्यात आली.
मनपाच्या बेल महोत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:09 AM