पाथर्डी फाटा : भारतीय बाल हार्मोन्स संघटना (आयएसपीएई) आणि जागतिक बालमधुमेही संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्पाई-२०१६’ या पहिल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेस आजपासून प्रारंभ झाला. हॉटेल एक्स्प्रेस इन येथे आयोजित या परिषदेचे उद्घाटन आधाराश्रमातील पाच हार्मोन्स पीडित मुलींच्या हस्ते करण्यात आले. भारतात बाल मधुमेहाचा इलाज ही एक अवघड समस्या आहे. यासाठी योग्य मार्गदर्शन व तज्ज्ञांची उणीव लक्षात घेऊन या क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर्स यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन व अनुभव मिळण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक डॉ. तुषार गोडबोले यांनी दिली. पहिल्या दिवशी झालेल्या कार्यशाळेत बालमधुमेहींची शुगर तपासणी, इन्शुलिन, आहार, पथ्ये, आजारपणात घ्यावयाची काळजी, घरच्या घरी रुग्ण व नातेवाइकांनी करायचे इलाज या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी लॅगझेनबर्गचे डॉ. करीन ब्यूफोर्ड, अबुधाबी येथील डॉ. अस्मा दिब, लखनौ येथील डॉ. प्रीती दबडघाव, दिल्ली येथील डॉ. अंजू बीरमानी व डॉ. गणेश जेवळीकर यांनी सहभाग नोंदविला. परिषदेसाठी देशभरातून सुमारे दीडशेच्यावर डॉक्टर्स, बालरोगतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ व परिचारिका आदि सहभागी झाले होते. डॉ. तुषार गोडबोले व डॉ. यशपाल गोगटे यांनी परिषदेचे संयोजन केले.
बाल हार्मोन्स संघटनेच्या राष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
By admin | Published: October 16, 2016 2:01 AM