निफाड : येथील शांतीनगर सहकारी गृहनिर्माण संस्था आणि वन विभाग यांच्या वतीने नक्षत्रवन प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला. या नक्षत्रवनात निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. दिग्रसकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी नक्षत्रवनांचे आणि वृक्ष आयुर्वेदाचे अभ्यासक माधव बर्वे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना ते म्हणाले नक्षत्रवन प्रकल्पांतर्गत वृक्षारोपण करून शांतीनगर गृहनिर्माण संस्था आणि वन विभाग यांनी ऋ षीतर्पण केले आहे. सध्या पितृपक्ष सुरू असून या पितृपक्षात पितरांच्या श्राद्धानिमित्त पितृतर्पण केले जाते तसेच कृषी तर्पण करण्याची पद्धत आहे ऋषीमुनींनी मानवी जीवन सुखमय होण्यासाठी तसेच पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले होते नक्षत्रवन हाच या पुरातन परंपरेचा त्यातील एक भाग असून चातकाच्या नक्षत्रानुसार प्रत्येक चातकाचा आराध्य हे वृक्ष असतो या वृक्षाची लागवड व संवर्धन करणे त्यांच्या छायेत जप करणे यामुळे मन:शांती लाभते असे बर्वे म्हणाले. त्यानंतर पी. डी. दिग्रसकर, वि. दा. व्यवहारे यांची भाषणे झाली. अध्यक्षस्थानी ब्रिजलाल भुतडा होते. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्राचे प्रमुख वि. दा. व्यवहारे, ब्रिजलाल भुतडा, शांतीनगर गृहनिर्माण सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शशांक सोनी, सेक्रटरी हेमंत ठोंबरे, खजिनदार सुनील कलंत्री, त्र्यंबकराव गुंजाळ, अशोक निकम, जगदीश बागडे, वैनतेय विद्यालयाच्या हरित सेना विभागाचे प्रमुख बी. आर. सोनवणे, जालिंदर कडाळे, रमेश सानप यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, वैनतेय विद्यालयाच्या हरित सेना विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्र म यशस्वीतेसाठी निफाड येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व सेवा केंद्र व वैनतेय विद्यालयाच्या हरित सेना विभागाचे सहकार्य लाभले.चौकट - माधव बर्वे हे नक्षत्रवन व वृक्ष आयुर्वेदाचे अभ्यासक असून त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर वनखात्याच्या जागेवर आर्टिलरी सेंटर, शासकीय, निमशासकीय जागेवर २९ नक्षत्रवनाची उभारणी केली आहे. निफाड येथे उभारले जाणारे हे ३० वे नक्षत्र वन आहे. या नक्षत्रवनात अडुळसा, आंबा, लिंब, खैर, पायर यासह इतर आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या नक्षत्रवनात विविध झाडे लावून हा भाग हिरवाईने नटवण्यात येणार आहे.