नाशिक : राज्य सामायिक परीक्षा विभागातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यस्तरावर आॅनलाइन एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन असून, पुढील महिन्यात २ ते १३ मे दरम्यान या परीक्षा होणार आहेत. आतापर्यंत या परीक्षा आॅफलाइन पद्धतीने घेतल्या जात होत्या. या वर्षापासून प्रथमच आॅनलाइन पद्धतीने परीक्षा होणार असून, या परीक्षांच्या सरावासाठी सोमवार (दि.१५) पासून ठाणे व रायगड जिल्ह्यातून या सराव परीक्षेला प्रारंभ झाला आहे.आॅनलाइन सीईटी परीक्षांच्या सरावासाठी ठाणे व रायगड यांसह अन्य जिल्ह्यांसाठी सराव चाचणीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करणार असल्याचे राज्य सीईटी सेलमार्फत कळविण्यात आले आहे. त्यामुळे तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसह नाशिकमधील विविध अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांना वेळापत्रकाची प्रतीक्षा लागलेली आहे. सीईटी परीक्षांकरिता यंदा राज्यभरातून ३ लाख ९६ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यापूर्वी राज्यभर या परीक्षा एकच दिवस व आॅफलाइन स्वरूपात होत होत्या. यंदापासून या परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यापूर्वी परीक्षेत विचारण्यात येणाºया प्रश्नांचे स्वरूप, काठिण्यपातळी समजावी, या उद्देशाने सराव परीक्षेस सुरुवात झाली आहे.५५ हजार विद्यार्थीआॅनलाइन सीईटीच्या सरावासाठी ५५ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. ठाणे येथे सोमवारी व मंगळवारी असे दोन दिवस, तर रायगडला मंगळवार व बुधवार परीक्षा होणार आहेत. उमेदवारांना सीईटी सराव परीक्षेचे वेळापत्रक त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त होणार असून, सीईटीच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वेळापत्रक पाहता येणार आहे.
आॅनलाइन सीईटी सराव परीक्षांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 1:00 AM