नाशिक : नागरिकांना हव्या त्यावेळी आणि हव्या त्या ठिकाणाहून प्रवास करण्यासाठी आता अॅपद्वारे रिक्षा नोंदविण्याच्या सेवेला प्रारंभ झाला असून, त्याला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. विशेष म्हणजे सध्या अल्प रिक्षा उपलब्ध होत असल्या तरी कोणत्याही स्थानिक रिक्षाचालकाला कंपनीशी संलग्न होऊन व्यवसाय करता येणार आहे.नाशिकमध्ये आता ओला, टॅक्सी फॉर शुअर यासारख्या कंपन्यांनी टॅक्सी सेवा सुरू करून काही महिने उलटले आहेत. अॅपद्वारे किंवा कॉल सेंटरवर भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून टॅक्सी मागविता येते. चांगल्या दर्जाची कार आणि तीही वातानुकूलित असल्याने नागरिकांना या सेवांनी आकर्षित केले आहे. पाठोपाठ उबेर कंपनीनेही नाशिककडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये रिक्षासेवेच्या तुलतेन अशाप्रकारच्या टॅक्सीने जाणे सोयीचे होतेच, शिवाय ठरल्यानुसारच भाडे आकारले जात असल्याने वादाचे प्रसंग उद्भवत नाही, असे अनेकांचे मत आहे. परंतु त्याही पुढे जाऊन नागरिकांना आॅनलाइन म्हणजे मागणीनुसार रिक्षासेवा सुरू करणारी जुगनू रिक्षा सेवा सुरू झाली आहे. अॅपद्वारे किंवा कंपनीने विहित केलेल्या दूरध्वनीवर संपर्क साधल्यानंतर लगेचच त्या प्रवाशाला हव्या त्या ठिकाणी रिक्षा उपलब्ध होते. रिक्षाचालक कोठे जाण्यास तयार होतो कधी होत नाही. भाडे आरटीओने निर्धारित केल्याप्रमाणे कधीच नसतात. शिवाय प्रवासी कोंबून शेअर रिक्षाद्वारे नेले जाते, या सर्व कल्पनांना फाटा देणारी आता खासगी कंपनीची सेवा असून, ठरावीक भाडे आकारले जाते. सध्या पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे ही सेवा सुरू झाली आहे. गेल्या १ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या या सेवेसाठी जुगनू कंपनीने १५ रिक्षाचालकांना सहभागी करून घेतले आहे. टॅक्सीसेवेप्रमाणेच ही सेवा सुरू आहे. टॅक्सीसेवेला स्थानिक रिक्षाचालकांनी विरोध केला असून त्यामुळे व्यावसायावरच प्रतिकूल परिणाम झाल्याची त्यांची तक्रार होती. परंतु आता कोणताही रिक्षाचालक या कंपनीच्या माध्यमातून पारदर्शक सेवा देऊ शकेल, असे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक मनप्रितसिंग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आॅनलाइन रिक्षासेवेला प्रारंभ
By admin | Published: October 25, 2015 10:43 PM