गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्याचा आढावा अध्यक्ष क्षीरसागर यांनी घेतला. त्यावेळी काही सदस्यांनीदेखील ग्रामीण भागात खासगी रुग्णालये कोरोनावर उपचारासाठी नकार देत असल्याचे तर काही रुग्णालयात जागा नसल्याचे सांगत असल्याची तक्रार केली. गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांना कोविड उपचाराची मुभा देत काही खाटा राखून ठेवल्या होत्या; परंतु कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर ही रुग्णालये पूर्ववत करण्यात आली. आता मात्र पुन्हा कोरोनाचा प्रभाव वाढत असून ग्रामीण भागात ही संख्या लक्षणीय झाली आहे. नाशिक शहरातदेखील रुग्णालये फुल्ल झाल्याची कारणे दिली जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची उपचाराविना हेळसांड होऊ लागली असल्याने क्षीरसागर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्याशी संपर्क साधून गेल्या वर्षी ज्या खासगी रुग्णालयांना कोविडसाठी परवानगी देण्यात आली ती पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. त्याच बरोबर जी रुग्णालये उपचार करण्यासाठी तयार असतील अशा रुग्णालयांना तत्काळ परवानगी देण्याचे आदेश दिले. ग्रामीण भागातील रुग्ण उपचारापासून वंचित राहू नयेत असेही त्यांनी बजावले.
ग्रामीण भागातील खासगी कोविड सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:14 AM