जुन्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नोंदणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 01:09 AM2018-07-31T01:09:55+5:302018-07-31T01:10:12+5:30
काँग्रेस नेतृत्वाशी थेट संपर्कासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या शक्ती प्रोजेक्टमधील नोंदणीचा शुभारंभ जुना आडगाव नाका परिसरातील काट्या मारुती चौकात करण्यात आला़ यावेळी काँग्रेस जोडो अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला़
नाशिक : काँग्रेस नेतृत्वाशी थेट संपर्कासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या शक्ती प्रोजेक्टमधील नोंदणीचा शुभारंभ जुना आडगाव नाका परिसरातील काट्या मारुती चौकात करण्यात आला़ यावेळी काँग्रेस जोडो अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला़ यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाची ताकद उभी करणार असल्याचे सांगितले, तर उपाध्यक्ष विजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाची सर्वांत मोठी ताकद प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता आहे. जो प्रत्येक गाव, शहर, तालुक्यात, जिल्ह्यात राहत असून, सर्व कार्यकर्त्यांना शक्तीच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे काम करायचे असून, त्याचा आवाज व विचार ऐकायचे आहे़ त्यामुळे जास्तीत जास्त लोकांची नोंदणी करण्याचे आवाहन केले़ शक्तीच्या माध्यमातून बूथ स्तरावर कार्यकर्ते मजबूत होणार असून, महिला व युवकांनीदेखील जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन नगरसेविका व महिला काँग्रेसच्या अध्यक्ष वत्सला खैरे यांनी व्यक्त केले. उद्योजक रमेश पवार, रामप्रसाद कातकाडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस सुनील आव्हाड, रमेश पवार, ओबीसी सेलची प्रदेश सचिव रामप्रसाद कातकाडे, सरचिटणीस अनिल कोठुळे, ज्येष्ठ नेते उत्तमराव बडदे, पंचवटी महिला ब्लॉक अध्यक्ष कल्पना पांडे आदी उपस्थित होत़े़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचवटी ब्लॉकचे अध्यक्ष उद्धव पवार यांनी केले़ आभार शहर काँग्रेस सरचिटणीस राजकुमार जेफ यांनी मानले़