देवळा : तालुक्यातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने दुष्काळमुक्तीसाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी हीच संधी समजून बापू जिभाऊ पवार या शेतकऱ्याने महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली झगडेपाडा पाझर तलावातील गाळ स्वखर्चाने काढण्यास प्रारंभ केला आहे.गतवर्षी देवळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये छोटे-छोटे बंधारे, जलस्रोतांचे विस्तारीकरण व खोलीकरण, लोकसहभागातून धरणातील गाळ काढणे यांसारखी कामे करून जास्तीत जास्त पाण्याचा संचय करून कायमस्वरूपी दुष्काळमुक्ती होण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्र म राबविण्यात आला. यासाठी लोकसहभागातून गाळमुक्त धरणासाठी जेसीबी मशीनला शासनातर्फेडिझेलचा पुरवठा करण्यात आला होता; परंतु गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे हे सर्व जलस्रोत कोरडेच राहिले. तालुक्याच्या पूर्व भागातील एकही धरण, पाझर तलाव, बंधारे, अथवा नदी-नाल्यांना पाणी आले नाही. यामुळे या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.झगडेपाडा पाझर तलावातील गाळ तीस वर्षांपासून काढण्यात आलेला नाही. यामुळे तलावाची साठवणक्षमता कमी झाली आहे. यामुळे परिसरातील शेतकºयांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. बापू पवार या शेतकºयाने मंडल अधिकारी व्ही.जी. पाटील, तलाठी सुभाष पवार आदींच्या सहकार्याने स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने झगडेपाडा पाझर तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ केला आहे.
झगडेपाडा पाझर तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 1:30 AM