नाशिक : महानगरातील रुग्णांच्या संख्येत प्रचंड मोठ्या संख्येने वाढ होऊ लागल्याने बेड कमी पडण्यास प्रारंभ झाल्याच्या पार्श्वभूमीवर मनपा आरोग्य विभागाच्या वतीने तातडीने शहरातील समाज कल्याणचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याशिवाय गरज भासल्यास मेरी, ठक्कर डोम आणि कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याने त्यांचीही पाहणी करण्यात येणार आहे.
महागरात कोरोना वाढू लागल्यानंतर, गतवर्षी मे महिन्यात भव्य जागांवर शेकडो बेड असलेली कोरोना सेंटर्स सुरू करण्यात आली होती, तसेच कोरोनाचा कहर झाल्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर ही सेंटरही भरून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, ऑक्टोबरपासून कोरोना कमी होऊ लागल्यानंतर या सेंटरमधील बेडही रिक्त राहण्याच्या प्रमाणात वाढ झाली. जानेवारीपर्यंत तर बहुतांश कोविड सेंटर रिक्त झाल्याने ती बंदही करण्यात आली हाेती. त्या पार्श्वभूमीवर रविवारी महापालिका आयुक्तांनी समाजकल्याणचे कोविड सेंटर, तसेच नाशिक रोडच्या मुक्तीधाममधील इमारतींची पाहणी केली. त्यानंतर, तत्काळ समाज कल्याणचे कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे सोमवारपासूनच समाज कल्याण केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले असून, झाकीर हुसेनमधील काही रुग्ण, तसेच गंभीर नसलेल्या कोविड रुग्णांना दाखल करून घेण्यात आले आहे. या सेंटरनंतर आवश्यकता भासल्यास अग्रक्रमाने मेरी सेंटर आणि ठक्कर डोमचे सेंटरही सुरू करण्यात येणार आहे.