कळवण : उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी ४० हजार भाविक देवीच्या चरणी नतमस्तक झाले.गुरूवारी सकाळी ७ वाजता जिल्हा सत्र न्यायाधीश न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते देवीची महापूजा करण्यात येऊन नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. तत्पूर्र्वी न्यासाच्या कार्यालयात देवीच्या दागिन्यांचे पूजन होऊन ब्रह्मवृंदांना वर्दी दिली. त्यानंतर सकाळी ८ वा. देवीच्या दागिन्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. देवीचा अभिषेक होऊन देवीला शालू नेसवून, मुकुट, कमरपट्टा, मंगळसूत्र, मोहनमाळ आदी दागिने चढविण्यात येऊन पंचामृत महापूजा व आरती सकाळी १० वाजता जिल्हा प्रधान न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते व अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश तथा सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या अध्यक्ष श्रीमती यू.एन. नंदेश्वर, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, तहसीलदार कैलास चावडे, विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, अॅड. अविनाश भिडे, राजेंद्र सूर्यवंशी, अॅड. जयंत जायभावे, उन्मेष गायधनी, मविप्र संचालक अशोक पवार, कळवण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उषाताई शिंदे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, संदीप बेनके पाटील यांच्या उपस्थितीत झाली. नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून, सप्तशृंगदेवी निवासिनी ट्रस्ट व विविध धार्मिक मंडळांतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:44 PM