लोकमत न्यूज नेटवर्कदेवळाली कॅम्प : सिंधी बांधवांच्या ‘पूज्य चालिहा साहिब जो मेलो’ (श्रावणव्रत) या व्रताला शुक्रवारपासून (दि.१४) सुरुवात होत असून, देवळालीसह नाशिकमधील शेकडो सिंधी बांधवांची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.देवळालीच्या झुलेलाल मंदिरात पूज्य दर्याशाह संगत ट्रस्टच्या वतीने सकाळी १० वाजता अखंड ज्योतीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर मंदिराच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत बहेराणा पूजन (ज्योतपूजन ) करून व्रतारंभ होणार आहे. व्रत करणाऱ्या भाविकांच्या हाती घनश्याम महाराज शर्मा यांच्या हस्ते गळ्यात जानवे व रक्षासूत्र बांधून व्रतस्थ राहण्याचा संकल्प करवून घेतला जाईल. दररोज सायंकाळी ६ वाजता अक्खा (मटका) पूजन, सकाळी ८ वाजता व सायंकाळी ६.३० वाजता आरती होईल. सोमवारी ( दि.२४) चंद्रदर्शन असल्याने भजन व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१४) श्रीकृष्ण जन्मानिमित्त भजन व प्रसाद वाटप होणार असून, बिहराणा साहिब (ज्योत) समोर देवळालीतील सिंधी बांधव विशेष भजन संध्या सादर करतील. या दिवसापासून ज्या बांधवांना महिनाभर व्रत करणे शक्य नाही ते बांधव या दिवसापासून शेवटचे नऊ दिवस व्रत करू शकतील. पूज्य चालिहा व्रताची ४०व्या दिवशी बुधवारी (दि.२३) विधिवत मटकी पूजन करून विशेष महत्त्व असलेले अक्खा पूजन व घड्याची मिरवणूक संसरी येथील दारणा नदीपर्यंत मिरवणूक काढली जाते. यावेळी जल व ज्योतपूजन, मटकी पूजन व भगवान झुलेलाल यांची आरती, अक्खा पावन मंत्र, पल्लव असे विधी केल्यानंतर या व्रताची सांगता होते.ज्या सिंधी बांधवांना हे व्रत करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी देवळालीच्या झुलेलाल मंदिरात जयप्रकाश चावला, मोहन सचदेव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पूज्य दर्याशाह संगत ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
आजपासून सिंधी चालिहास प्रारंभ
By admin | Published: July 14, 2017 1:32 AM