पुनंद पाणी योजनेस अखेर प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:11 AM2019-06-29T01:11:16+5:302019-06-29T01:11:53+5:30
शहरासाठी वरदान ठरणाऱ्या पुनंद पाणीपुरवठा योजनेला होत असलेला विरोध शुक्रवारी (दि.२८) मोठ्या पोलीस बंदोबस्तामुळे मोडीत निघाला. या योजनेसाठी सकाळी ९.३० वाजता जलवाहिनीचे पाइप टाकण्याच्या कामाला अतिरिक्त जिल्हाधिकारी, अपर पोलीस अधीक्षक, विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इनकॅमेरा प्रारंभ करून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे जिल्हा प्रशासनाने पालन केले. गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर या महत्त्वाकांक्षी योजनेच्या कामाला प्रारंभ झाला आहे.
सटाणा : शहरासाठी वरदान ठरणाऱ्या पुनंद पाणीपुरवठा योजनेला होत असलेला विरोध शुक्रवारी (दि.२८) मोठ्या पोलीस बंदोबस्तामुळे मोडीत निघाला. या योजनेसाठी सकाळी ९.३० वाजता जलवाहिनीचे पाइप टाकण्याच्या कामाला अतिरिक्त जिल्हाधिकारी, अपर पोलीस अधीक्षक, विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इनकॅमेरा प्रारंभ करून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे जिल्हा प्रशासनाने पालन केले. गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर या महत्त्वाकांक्षी योजनेच्या कामाला प्रारंभ झाला आहे.
राज्य शासनाने सटाणा शहरासाठी ५५ कोटी रुपये खर्चाची पुनंद पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. मात्र कळवण परिसरातील पुढारी मंडळींनी आंदोलन करून या योजनेला जोरदार विरोध केला होता. यामुळे सटाणावासीयांना भीषण पाणीटंचाईला सामोर जावे लागत आहे. शहराला संजीवनी ठरणारी योजना पूर्ण करण्यासाठी येथील अॅड. रोशन सोनवणे यांनी जनहित याचिका दाखल करून उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यावर गुरुवारी सुनावणी होऊन शुक्रवारपासून (दि.२८) पोलीस बंदोबस्तात इन कॅमेरा योजनेच्या कामाला सुरु वात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
निर्णयानुसार शुक्रवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास मालेगावचे
अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, नाशिक ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षक रश्मी वालावलकर, पंकज आशिया, पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे, सदाशिव वाघमारे यांनी पोलीस फौजफाट्यासह पुनंद धरण परिसराचा ताबा घेत धरण परिसरात नाकाबंदी सुरू केली. प्रत्येक वाहनाची चौकशी करूनच पुढे प्रवेश दिला गेल्याने अधिकारी, पोलीस व कामगारांव्यतिरिक्त परिसरात कुणालाही प्रवेश दिला गेला नाही.
दंगा नियंत्रण पथक तैनात
कोणत्याही परिस्थितीत पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होऊ देणार नाही, असा कळवणवासीयांनी दिलेला इशारा आणि दुसरीकडे दि. २८ रोजी पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे दिलेले आदेश यामुळे पोलीस प्रशासनाने संपूर्ण ताकद लावून पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केले. धरण मार्गात येणाºया प्रत्येक रस्त्यावर दंगा नियंत्रण पथकासह सशस्र पोलिसांचा खडा पहारा असल्याने संपूर्ण दिवसभर पुनंद धरण परिसरात जिकडे पाहावे तिकडे फक्त पोलीस दिसत होते.
सटाणा शहराच्या जवळ पुनंद पाणीपुरवठा योजनेचे पाइप ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी हे पाइप पुनंद धरणाकडे नेत असताना कळवणवासीयांनी तीव्र विरोध करीत पाइप भरलेली वाहने परतवून लावली होती. यावेळी मात्र हे पाइप पोलीस संरक्षणात पुनंद धरणावर आणले गेल्याने कोणीही विरोध करताना दिसून आले नाही.
पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाल्याची माहिती सटाणा शहरवासीयांना मिळताच सटाणा शहरात समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. दिवसभर शहरातील सोशल मीडियावर पुनंद पाणीपुरवठा योजनेचीच चर्चा सुरू होती. या योजनेमुळे खासकरून हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरणाºया महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.