नाशिक : कलावतांच्या कलागुणांना संपन्न करण्याबरोबरच रंगदेवतेची सेवा मनात रुजविण्यात एकांकिका स्पर्धांची भूमिका महत्त्वाची असून, अशाप्रकारच्या एकांकिकांना स्थानिक पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त होणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांनी केले. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कॉलेज कॅम्प्सस फ्रेन्ड सर्कलच्या वतीने पंडित पलुस्कर सभागृह येथे आयोजित वसंत करंडक-२०१९ या जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक गुरुमित बग्गा, वत्सला खैरे, श्रीकांत बेणी, रवींद्र कदम, प्रा.डॉ. राम कुलकर्णी, स्वप्नील तोरणे, रघुनाथ शृंगारपुरे, वसंत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण १८ एकांकिका सादर होणार आहेत. उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी ‘चलो सफर करे’, क्षितिजाच्या पलीकडे, प्रश्न आणि उत्तर या तीन एकांकिका सादर करण्यात आल्या. सोमवार, दि. २१ रोजी आठ एकांकिका सादर होणार आहेत. या एकांकिका प्रेक्षकांसाठी मेजवानी असणार आहे.‘चलो सफर करे’श्ांतनु चंद्रात्रे लिखित ‘चलो सफर करे’ या एकांकिकेत शहरी भागातील नोकरदार आणि ग्रामीण भागातील शेतकरी यांचा समानपातळीवर जगण्याचा सुरू असलेला संघर्ष आणि स्वर्गलोकात दोहोंचा होणारा प्रवास लेखक चंद्रात्रे यांनी संवेदनशीलतेने मांडला आहे. ‘क्षितिच्या पलीकडे या दुसऱ्या एकांकित नात्यातील घुसमट लेखक पराग दोंदे यांनी मांडली आहे. छोट्या खेड्यातून शहरात नोकरीसाठी आलेले दोघे एकत्र राहतात आणि कालांतराने त्यांच्यात निर्माण होणारे वाद यातून लेखकाने त्यांच्या मनातील ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री ‘प्रश्न आणि उत्तर’ ही एकांकिका सादर करण्यात आली.
वसंत करंडक एकांकिकेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 1:14 AM