नाशिक : आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी तालुकानिहाय इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. युती आणि आघाडीचा निर्णय शेवटी होणार असल्याने तूर्तास आपापल्या पक्षातील इच्छुकांची संख्या किती? कुठे उमेदवारांची वानवा आहे काय? यासह अन्य माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.अहिवंतवाडी, खेड आणि उमराळे गटातून इच्छुकांची संख्या जास्त असल्याचे यावेळी श्रेष्ठींना दिसून आले. नुकत्याच झालेल्या दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिनविरोध निवडणुकीत राष्ट्रवादीच्या काही इच्छुकांना आपल्या उमेदवारीस मुरड घालून शांत बसावे लागल्याने या बैठकीत या इच्छुकांनी श्रेष्ठींना बाजार समितीप्रमाणे निवडणुका बिनविरोध करणार असाल, तर आताच सांगा, असा घरचा अहेर दिल्याचे समजते. त्यामुळे ही बैठक आटोपती घ्यावी लागल्याची चर्चा आहे. तिकडे इगतपुरी तालुका पंचायत समिती उपसभापती पांडुरंग वारूंगसे यांचा राजीनामा होऊन त्या जागी प्रतिभा गोवर्धने यांची निवड करण्यात आली. या निवडीमागे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष असल्याची चर्चा आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद घोटी गटाच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. बागलाण आणि येवल्यातही अनुक्रमे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी तालुकास्तरावर बैठका घेऊन इच्छुकांची मते जाणून घेतल्याचे सांगण्यात येते. जिल्हा परिषद निवडणुकांना अवघा तीन महिन्यांचा कालावधी उरल्याने आता राजकीय पक्षांनी गट-गण निहाय बैठका आणि इच्छुकांची मते जाणून घेत जिल्हा परिषद निवडणुकीस वेग दिल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
इच्छुकांच्या चाचपणीने रणधुमाळीला सुरुवात
By admin | Published: October 21, 2016 1:53 AM