नाशिक : नाटक हा संवेदनशील मनांचा आरसा असून त्यातील वास्तव तितक्याच अस्सलपणे मांडल्यास ते मनाला भिडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी सुनील देशपांडे यांनी केले. त्याआधी देशपांडे यांच्यासह नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम, सचिव सुनील ढगे, समन्वयक राजू जाधव, रवी साळवे यांच्या उपस्थितीत ५९व्या महाराष्ट राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे उद््घाटन करण्यात आले.कालिदास नाट्यमंदिरात शुक्रवारी सायंकाळी हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना देशपांडे नाटक हे अत्यंत सजगपणे करण्याचे माध्यम असल्याचे सांगितले. कोणत्याही सच्च्या कलाकाराला नाटक हे श्वासासारखे प्राणाहून प्रिय असते. नाटकाशी निगडीत प्रत्येकाने संवेदनशील राहून ते सादर केल्यास प्रेक्षकांना भावते. कलाकारांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांकडून पसंती लाभली की यश निश्चितपणे मिळते, असेही देशपांडे यांनी सांगितले. तसेच राज्य शासनाच्या वतीने सातत्याने ५८ वर्षे हा उपक्रम सुरू ठेवून कलाकारांना अत्यंत चांगले व्यासपीठ मिळवून दिले असल्याने शासनाचेदेखील कौतुक करावे तितके कमीच असल्याचेही देशपांडे यांनी नमूद केले.या स्पर्धेत एकूण १९ संघांनी सहभाग नोंदवला असून, सर्वच रंगकर्मी एकाहून एक दमदार सादरीकरण करतील, असा विश्वासदेखील कदम यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी चारुदत्त दीक्षित आणि सहकाऱ्यांनी नमन नटवरा विस्मयकारा ही नांदी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर जगताप आणि श्रावणी जगताप यांनी केले.नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम यांनी राज्य नाट्य स्पर्धेच्या माध्यमातूनच पुढील रंगकर्मींच्या पिढ्या घडत असल्याचे सांगितले. तसेच या हौशी कलाकारांना नाटकाच्या सादरीकरणासाठी राज्य शासनाकडून जे सहा हजार रुपये दिले जातात, त्याऐवजी दहा हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे केली असल्याचेही कदम यांनी नमूद केले.
राज्य हौशी नाट्य स्पर्धेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 1:06 AM