विंचूर : विंचूर-लासलगाव रस्त्यावरील खड्ड्यांच्या कामास अखेर प्रारंभ करण्यात आला आहे. गत सहा ते सात महिन्यांपासून लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर रस्तादुरुस्तीस मुहूर्त मिळाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.वाहतुकीच्या व आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोकादायक बनलेल्या रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात ‘विंचूर-लासलगाव रस्त्याची झाली चाळण’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून रस्त्याची किती दुरवस्था झाली आहे हे सचित्र मांडले होते. तालुक्याच्या पूर्वभागातील गावांना लासलगावशी जोडणारा व दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण व एकमेव असलेल्या विंचूर -लासलगाव रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रि या उमटत होत्या. शिवसेनेसह विविध संघटनांनी वारंवार निवेदन देऊन रस्तादुरुस्तीची मागणी लावून धरली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झोपेचे सोंग घेतले जात असल्याने शिवसेना शहरप्रमुख नानासाहेब जेऊघाले यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर विंचूर -लासलगाव रस्त्यावरील खड्ड्यांत डांबर टाकून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला. हा रस्ता अक्षरश: उद्ध्वस्त झाल्याने रस्त्यावरून अगदी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. मात्र कालपासून खड्ड्यांमध्ये डांबर टाकून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विंचूर लासलगाव रस्त्यावर नुकत्याच झालेल्या नवीन पुलावरील खड्डे दुरुस्तीसह विंचूरपासून लासलगावपर्यंत कार्पेटचा हात मारला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची वर्दळ वाढणार असल्याने रस्तादुरुस्तीस प्रारंभ करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
विंचूर-लासलगाव रस्तादुरुस्तीस प्रारंभ
By admin | Published: October 28, 2016 11:51 PM