नाशिक : महापालिकेने सोमवार (दि. २२) पासून विभागवार आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सिडको आणि पूर्व विभागातील काही परिसरापासून सुरू केली असली, तरी जलशुद्धिकरणनिहाय पाणीकपातीचे धोरण राबविताना पाणीपुरवठा विभागाला मोठी कसरत करावी लागली. प्रशासनाने आता पाणीबचतीसाठी नागरिकांच्या प्रबोधनावर भर देण्याचे ठरविले असून, महापौर स्वत: नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. मंगळवारी (दि. २३) संपूर्ण सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागासह पूर्व विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.बहुचर्चित एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयाची अखेर सोमवार, दि. २२ पासून अंमलबजावणी सुरू झाली. दर सोमवारी संपूर्ण सिडको आणि नाशिक पूर्व विभागातील काही प्रभागांमधील परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने पाणीकपातीची अंमलबजावणीही सिडकोपासून सुरू करण्यात आली. सिडको आणि पूर्व विभागाला शिवाजीनगर आणि बारा बंगला जलशुद्धिकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेकडून सुरू असलेल्या नियमित १५ टक्के पाणीकपातीमुळे शिवाजीनगर जलशुद्धिकरण केंद्रातून यापूर्वी प्रतिदिन १२२ दशलक्ष लिटर्स, तर बारा बंगला जलशुद्धिकरण केंद्रातून ७६ दशलक्ष लिटर्स पाणी वितरित केले जात होते. आता एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे सदर जलशुद्धिकरण केंद्रातून कमी पाणी उचलले गेले. सोमवारी सिडको व पूर्व भागातील काही भागात पाणी बंद ठेवण्यात येणार असल्याने रविवारी रात्रीच सदर भागातील जलकुंभ भरण्याचे काम थांबविण्यात आले होते.
पाणीकपातीस प्रारंभ; मनपाची कसरत
By admin | Published: February 23, 2016 12:04 AM