नाशिक : गेल्या शंभर वर्षांपासून प्रलंबित असलेला मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर या रेल्वे प्रकल्पास मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात या रेल्वेमार्गाचे काम सुरू झालेले नाही. हा रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी खासदार, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष प्रताप सोनवणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. मोदी यांच्याबरोबरच प्रताप सोनवणे यांनी या मागणीचे निवेदन वित्तमंत्री अरुण जेटली, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. खान्देशसाठी महत्त्वाचा ठरू शकणारा हा रेल्वेमार्ग तत्काळ मार्गी लावावा, असे सोनवणे यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे हा रेल्वेमार्ग मार्गी लागण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी केली आहे. त्याचप्रमाणे धुळे शहर आणि मालेगाव, तसेच बागलाण तालुक्याचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पाणीपुरवठा योजनांना व पाणी प्रकल्पांनाही निधी उपलब्ध करून द्यावा, असे सोनवणे यांनी निवेदनात नमूद केले आहे. (प्रतिनिधी) कांदा निर्यातबंदी उठवा महाराष्ट्र कृषिप्रधान राज्य आहे. त्यात उत्तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शेती व्यवसायावर आधारित असून नाशिक, धुळे व जळगाव या जिल्ह्णांत कांदा हे महत्त्वाचे पीक आहे. या पिकावरच येथील शेतकऱ्यांचे जीवन अवलंबून आहे. केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्यातबंदी आणि जीवनावश्यक वस्तूत समावेश केल्याने मोठे नुकसान होत आहे. कांद्याचे भाव दररोज घसरत असून, शेतकऱ्याला कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. जिह्णातील शेतकरी अडचणीत सापडला असून, कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने उठविण्याचा निर्णय घ्यावा, अशा मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रताप सोनवणे यांनी दिले आहे.
मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे काम तातडीने सुरू करा : प्रताप सोनवणे
By admin | Published: August 14, 2014 11:36 PM