खामखेडा : सटाणा - पिंपळदर-मांगबारी ते कळवणपर्यंत रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. या रस्त्याची दुरवस्था झाली होती.मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरील प्रवास धोकादायक झाला होता.वाहन चालकांना या मार्गावरून खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. यामुळे अपघातात देखील वाढ झाली होती. याबाबत मांगबारी-पिंपळदर रस्त्याची दुरवस्था,ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यावरील प्रवास धोकादायक,बांधकाम विभागाचे दुर्लक्ष याबाबत लोकमतमध्ये बातमी प्रकाशित करण्यात आली होती. बांधकाम विभागाने या बातमीचा दखल घेऊन साक्र ी-नामपूर-सटाणा- मांगबारी-खामखेडा-कळवण-नांदुरी-वणी-नाशिक हा राज्य माहामार्ग क्र मांक १७ असून हा रस्ता नाशिक व नांदुरी गडावर जाण्यासाठी जवळचा असल्याने या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. परंतु या महामार्गवरील पिपळदर - मांगबारी घाट माथा या तीन किलोमीटर व खामखेडा ते बेज हा सहा किलोमीटर रस्त्याची मोठ्या प्रमाणात मोठमोठी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून वाहन चालवणे मोठी मुश्किल झाले होते . यामुळे वाहन चालक वाहन चालविताना खड्डे टाळताना लहान- मोठे अपघात होत असे. यामार्गावरून नवापूर,नंदुरबार,धुळे आदी खान्देश भागातील भाविकांना सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी हा रस्ता सोयीस्कर असल्याने या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहनांची वर्दळ असते तसेच सापुतारा,नाशिक जाण्यासाठी सुद्धा हा रस्ता सोयीस्कर असल्याने या रस्त्यावरून नागरिक मोठ्या प्रमाणात ये-जा करतात.
पिंपळदर-मांगबारी रस्त्याच्या कामाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 2:20 PM