नाशिकरोड : परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देखावे, आरास साकारण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, घराघरांतदेखील लाडक्या गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. मनपा व पोलीस प्रशासनाने जाचक अटींची कठोर अंमलबजावणी केल्याने लहान-मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या परिश्रमाने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून परवानगी मिळाल्याने मंडप व उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे, तर काही छोट्या-मोठ्या मंडळांचे मंडप उभारणीचे काम पूर्ण झाले असून, देखावे साकारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. घराघरांतदेखील लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने स्वच्छता, साफसफाई करण्याचे काम गृहिणी वर्गाकडून केले जात आहे. जेलरोड येथे श्री गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल थाटण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा येतो म्हणून शहर वाहतूक शाखेने व गाळ्या मागील जागा मालकाने हरकत घेतली होती. मूर्ती विक्रेत्यांच्या स्टॉलधारकांनी जाचक अटीमुळे मनपाच्या लिलावात भाग न घेता स्वत:च्या खासगी जागेत, मोटवानीरोड येथील पाटीदार भवन व शिखरेवाडी येथील मोकळ्या खासगी जागेत विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. यंदा जेलरोडला गणपती विक्रीचे स्टॉल नसल्याने भाविकांची माहिती नसल्याने गैरसोय होत आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घराघरात व सोसायटी, कॉलनीत छोट्या मंडळाच्या देखाव्यासाठी विविध शोभीवंत वस्तू, लायटिंग आदी विक्रीस दाखल झाले आहे. तसेच ठिकठिकाणी सीडी विक्रीच्या दुकानात श्री गणरायाची गाणे लावली जात असल्याने भक्तिमय वातावरणास सुरूवात झाली आहे.मनपाची नवीन सक्तीमनपाच्या जाचक अटीमुळे गणेशोत्सव मंडपाची परवानगी घेता घेता कार्यकर्त्यांना नाकीनव आले होते. आता मनपा प्रशासनाकडून परवानगी दाखला व शुल्क भरल्याची पावती देण्यात येत असून, मंडळाने त्याचेही डिजिटल प्रिंटिंग करून मंडपाच्या दर्शनी बाजूस लावण्याचे सांगण्यात येत आहे.
गणेशोत्सव मंडळाचे देखावे साकारण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:29 AM