नाशिक : निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेचा भाग म्हणून चार दिवस राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेदरम्यान, मतदान केंद्र असलेल्या महापालिकेच्या सर्व शाळा सुरू ठेवण्याच्या त्याचबरोबर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात येत असून, लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे यादीतून गहाळ झाल्याची बाब आयोगाने गांभीर्याने घेतल्यामुळे ज्यांची नावे गहाळ झाली त्यांना मतदार नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार २१ व २२ जून तसेच २८ व २९ जून अशा प्रत्येक शनिवार व रविवार असे चार दिवस प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यासाठी मतदान केंद्र असलेल्या शाळा या दिवशी पूर्णवेळ उघड्या ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी त्या त्या मतदान केंद्रासाठी नेमलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) हजर राहणे सक्तीचे करण्यात आले असून, या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असे गृहीत धरून बीएलओंच्या मदतीला त्या त्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही हजर राहणे सक्तीचे करण्यात आले आहे. यासंदर्भात निवडणूक शाखेने महापालिका शिक्षण विभागाला पत्र पाठवून तशी तजवीज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेत मतदार नोंदणीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या मतदाराचे आवश्यक ते पुरावे तपासून मगच ते स्वीकृत करावेत, तसेच आलेल्या प्रत्येक अर्जांची रजिस्टरमध्ये नोंद घेण्याबरोबरच त्याचा अनुक्रमांक व यादी भाग क्रमांक अर्जावर व पोहोच पावतीवर लिहिण्यात यावा व तसा शिक्का मारावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. परिपूर्ण नसलेले अर्ज स्वीकृत न करता, मतदाराकडूनच ते पूर्ण करून घ्यावेत, असेही सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या दिवशी शाळा सुरू
By admin | Published: June 19, 2014 12:42 AM