इंदिरानगर / सिडको : दोन दिवसांपूर्वी सुंदरबन कॉलनीकडून कमोदनगरकडे जाताना उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या भावनांची दखल घेत शुक्रवारी सिडकोतील नागरिकांना इंदिरानगरकडे जाण्यासाठी सुंदरबन कॉलनी ते कमोदनगर असा उड्डाणपुलाच्या खालून पादचारी भुयारी मार्ग करण्याच्या कामाचा शुभारंभ अपघातातील मयत कुणालचे वडील आशिष तांबट यांच्या हस्ते करण्यात आला. कमोदनगर येथून महामार्ग उड्डाणपूल ओलांडताना बुधवारी (दि. २९) संध्याकाळी अपघातात माय-लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण सिडको परिसरावर शोककळा पसरली होती. मागील तीन वर्षांपासून कमोदनगरजवळ उड्डाणपुलाच्या खाली बोगदा करण्याची मागणी केली जात असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने उड्डाणपूल ओलांडताना आतापर्यंत २५ हून अधिक लोकांचा बळी गेला. महामार्ग प्राधिकरणाला बोगदा तयार करण्यासाठी अजून किती बळी हवेत असा संतप्त सवाल उपस्थित करीत खासदार हेमंत गोडसे यांना सुमारे २०० हून अधिक महिलांनी घेराव घातला होता. महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपुलाखालील पादचारी भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात न केल्यास महामार्ग रोखण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी ११ वाजता आमदार देवयानी फरांदे यांनी कमोदनगरवासीयांची भेट घेतली व महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी प्रशांत खोडस्कर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पादचारी भुयारी मार्गाचे काम तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्यावर खोडस्कर यांनी, सुंदरबन कॉलनी समोरून भूमिगत मार्गाच्या कामाला सुरुवात करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर कमोदनगर येथे शेकडोच्या संख्येने जमलेल्या महिला व आमदार फरांदे, नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी, श्याम बडोदे, शाहीन मिर्झा, चंद्रकांत खोडे, यशवंत निकुळे आदींनी कमोदनगरपासून समांतर रस्त्याने पेठेनगर समोरील यू-टर्नची पाहणी करीत सुंदरबन कॉलनी समोरील भूमिगत कामाच्या ठिकाणी पोहोचले. दुसरीकडे सुंदरबन कॉलनी येथेही शिवसेना नगरसेवक कल्पना पांडे, माजी नगरसेवक चंद्रकांत पांडे, शिवाजी चुंभळे, सागर पाटील, राजू बिलीव्ह, प्रदीप कोते, नाना दळवी, राजेंद्र देसाई, प्रदीप कोतवाल, ठोंबरे, धनंजय दळवी आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी गोडसे यांचेही या ठिकाणी आगमन झाल्याने नागरिकांच्या भावना अधिकच तीव्र झाल्या.राजकारण्यांना टाळून तांबट यांना प्राधान्यसकाळी अकरा वाजेच्या सुमारास सिडकोतून इंदिरानगरकडे जाण्यासाठी सुंदरबन कॉलनी येथे उड्डाणपुलाच्या खालून भुयारी पादचारी मार्ग करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे याठिकाणी आले असता नगरसेवक कल्पना पांडे व परिसरातील स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटन करण्यास विरोध दर्शविला. यांनतर कुणालचे वडील आशिष तांबट यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.भुयारी मार्गाला मयत कुणालचे नाव द्यावेउड्डाणपूल ओलांडताना झालेल्या अपघातात चार वर्षीय चिमुकल्या कुणालसह त्याची आई शीतल तांबट यांचा दुर्दैवी मूत्यू झाला. त्यातूनच पादचारी भुयारी मार्गासाठी मोठे जनआंदोलन उभे राहिल्याने शुक्रवारी सुंदरबन कॉलनी-कमोदनगर भुयारी पादचारी मार्गाचे काम सुरू करण्याच्याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी भुयारी मार्गास मयत कोमलचे नाव देण्याची मागणी केली.
सुंदरबन कॉलनी-कमोदनगर पादचारी भूमिगत मार्गाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:47 PM