नाशिक (सुयोग जोशी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन शनिवारी (दि.९) दादासाहेब गायकवाड सभागृहात होणार असून त्यासाठी राज्यभरातील मनसे नेते व पदाधिकारी नाशिकला आले आहेत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुका लढण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कोणती नवी राजकीय भूमिका घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
मनसे वर्धापन दिनाचा मान नाशिकला देण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून राज ठाकरे व युवा नेते अमित ठाकरे नाशकात तळ ठोकून आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमुळे मनसेच्या या मेळाव्याला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. मनसे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार का?, भाजपसोबत जात महायुतीत समाविष्ट होणार की 'एकला चलो रे'ची भुमिका घेणार याबाबत आजच्या मेळाव्यात सस्पेन्स संपवत राज ठाकरे पुढील चित्र स्पष्ट करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
वर्धापन दिनामुळे मनसेने जोरदार तयारी केली असून सर्व शहरात झेंडे, फलक लावले आहेत. राज्यभरातून येणारे नेते व पदाधिकारी यांना राज ठाकरे यांच्या भाषणाची उत्सुकता असून ठाकरे शैलीत ते कोणाचा समाचार घेतात व त्यांच्या रडारवर कोण असेल याकडे लक्ष लागून आहे.