नाशिक : नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या संयुक्त विद्यमाने राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन नाशिक जिमखाना येथे दि. ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत १९ व २१ वर्षाखालील वयोगटातील मुले व मुली एकेरी तसेच पुरुष व महिला एकेरी अशा सहा गटांतील सामने होणार आहेत.
या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड होणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण ३८५ प्रवेशिका आल्या असून, या स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्याबरोबर उपांत्य फेरीतील खेळाडूंना रोख पारितोषिक आणि मेडल्स देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मोबी स्पोर्ट्स, मुंबई यांच्यामार्फत या स्पर्धेचे लाईव्ह प्रसारण यू-ट्यूब व फेसबुकवर करण्यात येणार आहे. हे प्रसारण संपूर्ण देशात पाहता येणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ ३ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी २.३० वाजता महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे नवनिर्वाचित जनरल सेक्रेटरी नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या स्पर्धेचे प्रमुख पंच मधुकर लोणारे हे काम पाहणार आहेत. या स्पर्धेची तयारी झाली असून, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांचे मार्गदर्शनाखालील स्पर्धा सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, मिलिंद कचोळे, संजय वसंत, अभिषेक छाजेड, अलका कुलकर्णी, राकेश पाटील, जय मोडक आदी प्रयत्नशील आहेत.
इन्फो
पुरुष गटात सिद्धेश, महिला गटात मधुरिका अव्वल
स्पर्धेसाठीच्या मानांकनात सिद्धेश पांडे तर महिला गटात मधुरिका पाटकर यांना अव्वल मानांकन देण्यात आले. २१ आणि १९ वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिकची तनिषा कोटेचा अव्वल, तर सायली वाणी व्दितीय स्थानी असून, याच वयोगटात मुलांमध्ये रेगन अल्बुकर आणि दीपित पाटील यांना अव्वल मानांकन देण्यात आले आहे.