राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आज येवला दौऱ्यावर आहेत. छगन भुजबळ नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातील ४६ गावांतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे.
छगन भुजबळ यांनी जिथे विरोध केला जातोय, तिकडे मी जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. तसेच विरोध करणारे किती आणि या म्हणारे किती... हेही बघायला हवं, असं छगन भुजबळ म्हणाले. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा पोलीस बंदोबस्त येवला भुजबळ संपर्क कार्यालयावर व दौऱ्यादरम्यान तैनात करण्यात आला आहे.
गारपीटग्रस्तांकडून काही फोन आले त्यात त्यांनी साहेब तुम्ही काही आलेच नाही, अशी विचारणा केली. त्यावर मी त्यांना सांगितले, आम्हाला तर गावबंदी आहे. तरीपण जोपर्यंत मी आमदार आहे, तोपर्यंत मला मतदारसंघात जाणे आवश्यक आहे. मी तिथे जायला पाहिजे, काम केले पाहिजे अशा शब्दात भुजबळ यांनी गावबंदीबाबत शालजोडीतील टोला लगावला.
शासनाकडून गारपीटग्रस्त, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शासनाकडून अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. कांदा उत्पादक आणि द्राक्षासह अन्य बागावाल्यांच्या डोक्यावरही कर्ज असून, ज्यांचे नुकसान झाले आहे, त्या सर्वांनाच मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. ज्यांच्या बागाच पूर्ण गेल्या त्यांचे तर तीन-चार वर्षांचे नुकसान झाल्याने त्यांना काही विशेष पॅकेज मिळवून देण्याबाबतही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले. शेतकरी बांधवांच्या पाठीशी सरकार उभे राहणार असल्याचेही छगन भुजबळांनी यावेळी नमूद केले.