लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शालेय स्तरावरील कला व क्रीडा विषय संपविण्याचा राज्य शासनाचा घाट असून, कला शिक्षकांच्या शालेय तासिका कमी करून त्यांची कुचंबणा करण्यात येत आहे, तसेच त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, असा आरोप कला शिक्षकांनी केला आहे. व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघाच्या वतीने शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात आले असून, त्यात म्हटले आहे की, चित्रकला हा विषय प्राथमिक शाळेपासून शिकविण्यात यावा, अशी मागणी असताना इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळेत स्वतंत्र चित्रकला शिक्षकांची भरती केलेली नाही. तरीही वर्गशिक्षक आणि अन्य विषयांचे शिक्षक चित्रकला विषय शिकवितात. त्यासाठी आठवड्यात प्रत्येकी चार- चार तासिका असतात. वास्तविक पाहता याठिकाणी चित्रकला शिक्षक नेमणे आवश्यक आहे. कार्यानुभव विषयासाठी देखील ही अडचण निर्माण होते. तसेच कलाशिक्षक भरती, वेतन वाढ व अन्य मागण्याप्रलंबित आहेत. निवेदनावर संजय बोरसे, सचिन पगार, संदीप पांडे, अशोक घुगे, रमेश वारे, योगेश वाल्डे, तुकाराम गुळवे, सुनील वाघ, देवदत्त अहिरराव, दत्ता बागुल, श्रीराम पाटील, महेंद्र कुमार झोले, संतोष मासाळ, चंद्रशेखर सावंत, शांताराम जगदाडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कला, क्रीडा विषय संपविण्याचा राज्य शासनाचा घाट
By admin | Published: May 16, 2017 12:33 AM