लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती व शेतमालाला हमीभाव यांसह शेतीसंबंधी मागण्यांसाठी सोमवारी (दि.५) पुकारलेल्या राज्यव्यापी बंदनंतर किसान क्र ांती मोर्चाच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीची मंगळवारी (दि.६) आढावा बैठक होणार असून, या बैठकीत नाशिकमध्ये गुरुवारी बोलावलेल्या राज्यस्तरीय शेतकरी परिषदेचे नियोजनही करण्यात येणार आहे. नाशकात होणाऱ्या शेतकरी परिषदेत शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाविषयी चर्चा होणार असून, संपाची पुढील रणनीती ठरविण्यासाठी संपूर्ण राज्यभरातील शेतकरी व विविध शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांच्या संपाला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुणतांबा येथील जयाजी सूर्यवंशी व धनंजय जाधव यांना जाळ्यात ओढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकरी संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीला उपस्थित शेतकऱ्यांनी संपाची सूत्रे नाशिकमधून हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र काही मोजक्या शेतकऱ्यांनी अचानकपणे रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संप मागे घेतल्याची घोषणा केली. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी बैठकीत २१ जणांच्या सुकाणू समितीची निवड करण्यात आली आहे. ही समिती मंगळवारच्या राज्यव्यापी बंदचा आढावा घेणार असून, बंदला मिळालेला प्रतिसाद व राहिलेल्या त्रुटींचा अभ्यास करून बंदच्या यशाचा अहवाल गुरुवारी (दि.८) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बोलाविण्यात आलेल्या शेतकरी परिषदेत मांडणार आहे. नाशकात होणाऱ्या शेतकरी परिषदेतूनच संपाची पुढील दिशा ठरणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी सोमवारी पुकारलेल्या राज्य व्यापी बंदमध्ये राहिलेल्या उणिवा भरून काढण्याची रणनीतीही शेतकरी परिषदेत निश्चित करण्यात येणार आहे.
नाशकात गुरुवारी राज्यस्तरीय शेतकरी परिषद
By admin | Published: June 06, 2017 3:06 AM