नाशिक : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड, महाराष्ट्र व सेन्स इंटरनॅशनल इंडिया या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने डेफब्लाइन्ड व मल्टीपल डिसेबल यांची ओळख होण्यासाठी, तसेच डेफब्लाइन्डनेसची कारणे, त्यांचे प्रकार यांची ओळख व मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीने राज्यातील मेडिकल प्रोफेशनल्स, पॅरा-मेडिकल प्रोफेशनल्स, थेरेपिस्ट व हेल्थ वर्कर यांच्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिव्हील सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली व मेडिकल कॉलेजच्या डीन डॉ. मृणाल पाटील व नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. उमेश तोरणे यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी नॅब महाराष्ट्राचे मानद महासचिव गोपी मयूर, सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, श्याम पाडेकर, सेन्स इंटरनॅशनल इंडियाचे मॅनेजर ट्रेनिंग व रिसर्च सचिन रिझाल उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोपी मयूर यांनी नॅबच्या कार्याची माहिती देऊन कार्यक्रमाची प्रस्तावना केली. सेन्स इंटरनॅशनल इंडियाचे सचिन रिझाल यांनी सेन्स इंटरनॅशनल इंडिया संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर डॉ. उमेश तोरणे यांनी कर्णबधिर व अंध यांच्या जीवनात येणाऱ्या समस्यांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी प्रशिक्षणार्थींना सदर प्रशिक्षणाचा लाभ घेऊन समाजातील अंध- अपंग व्यक्तींच्या पुनर्वसन कार्यासाठी सेवाभावी वृत्तीने काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डेफब्लाइन्ड प्रकल्पाच्या प्राचार्य ज्योती आव्हाड यांनी केले. (प्रतिनिधी)
कर्णबधिर, अंध, बहुविकलांगांच्या समस्यांबाबत राज्यस्तरीय चर्चासत्र
By admin | Published: December 14, 2015 10:16 PM