सटाणा : संपूर्ण देशासह राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागलेले असतांना देशाचे संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी गेल्या बागलाण विधानसभा निवडणुकीत अल्प मतांनी पराभूत झालेले माजी आमदार दिलीप मंगळू बोरसे यांना आगामी विधानसभा निवडणूक भाजपकडूनच लढविण्यासाठी खुली आॅफर दिली आहे. ‘तुम्ही तयारीला लागा,भाजपा तुमच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी राहील’ असा विश्वास दिल्याने बागलाण तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसात विद्यमान आमदार चव्हाण आणि राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्यात सिंचन कामांप्रश्नी श्रेयवादाची लढाई सुरू असल्याने भामरे यांच्या या खेळीबद्दल राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.बागलाण तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रश्न मार्गी लावल्याने माजी आमदार दिलीप बोरसे आपल्या कार्यकर्त्यांसह संरक्षण राज्यमंत्री डॉ.भामरे यांचा सत्कार करण्यासाठी धुळे येथे गेले होते. त्यावेळी डॉ.भामरे यांनी जाहीरपणे माजी आमदार दिलीप बोरसे यांनीच भाजपकडून आगामी विधानसभेची निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. ‘तुम्ही कामाला लागा,तिकीटाची जबाबदारी माझ्यावर सोपवा’,असे त्यांनी स्पष्ट केल्याने आगामी बागलाण विधानसभा मतदार संघासाठी भाजपकडून बोरसे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत. ‘यापूर्वी झाले गेले ,गंगेला मिळाले. आजपासून सर्वजण जोमाने कामाला लागू. सर्व एकत्र मिळून खांद्याला खांदा लावून काम करू’असे आवाहनही डॉ.भामरे यांनी केले.यावेळी डॉ,शेषराव पाटील,सटाणा जल संघर्ष समितीचे प्रवीण सोनवणे,नामपूर बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब भामरे, प्रदीप कांकरिया,चंद्रकांत मानकर, वीरगावचे सरपंच ज्ञानेश्वर देवरे आदींसह माजी आमदार बोरसे यांचे समर्थक उपस्थित होते.
राज्यमंत्र्यांनी दिली बोरसेंना उमेदवारीची आॅफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 6:53 PM
बागलाण विधानसभा : राजकीय समिकरणे बदलणार
ठळक मुद्देगेल्या काही दिवसात विद्यमान आमदार चव्हाण आणि राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्यात सिंचन कामांप्रश्नी श्रेयवादाची लढाई सुरू असल्याने भामरे यांच्या या खेळीबद्दल राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.