प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नाशिकला हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 12:15 AM2021-06-26T00:15:20+5:302021-06-26T00:15:49+5:30
आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बांधणीसाठी उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगाव, धुळे, नंदुरबारचा दौरा करून नाशिक जिल्ह्याला हुलकावणी दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निराशा व्यक्त केली जात असून, पदाधिकाऱ्यांना मात्र हायसे वाटले आहे.
नाशिक : आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बांधणीसाठी उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगाव, धुळे, नंदुरबारचा दौरा करून नाशिक जिल्ह्याला हुलकावणी दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निराशा व्यक्त केली जात असून, पदाधिकाऱ्यांना मात्र हायसे वाटले आहे.
पटोले यांचा दौरा अचानक रद्द करण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नसले, तरी जिल्ह्यातील काँग्रेसची एकूणच झालेली वाताहत पाहता पटोले यांनी ‘हात दाखवून अवलक्षण नको’ म्हणून दौरा रद्द केल्याची चर्चा होत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नाना पटोले हे पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याने विभागातील प्रत्येक जिल्ह्याने पटोलेंचे जाेरदार स्वागत व त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठका, मेळाव्यांची तयारी केली होती. नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि.२६) सकाळी आगमन होऊन दिवसभर त्यांच्या झंझावाती दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेण्यात आल्या.
नाना पटोले यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पक्ष संघटनेचे बळकटीकरण व रखडलेल्या पक्षीय नियुक्त्यांचा प्रश्न निकाली निघण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. त्यादृष्टीने काहींनी तयारीही केली. प्रत्यक्षात पटोले यांनी नाशिक सोडून अन्य जिल्ह्यातील नियोजित दौरा पूर्ण केला व नाशिकला टाळून ते तातडीने मुंबईकडे गुरुवारी रात्री रवाना झाले.
पटोले यांना दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी बोलावणे धाडल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याचे स्थानिक नेत्यांनी सांगितले आहे. मात्र, पटोले यांचा दौरा रद्द झाल्याने सामान्य काँग्रेस कार्यकर्ते निराश झाले आहेत. पक्षाची गेल्या काही वर्षांत झालेली वाताहत पाहता त्याविषयीच्या
भावना पटोले यांच्या कानी घालण्याची संधी हुकल्याची खंत व्यक्त केली जात असून, नेमकी हीच उदासीनता प्रदेशाध्यक्षांसमोर उघड होऊ नये म्हणून बरे झाले. दौरा रद्द झाला म्हणून पदाधिकाऱ्यांना हायसे वाटले आहे.
पटोलेंचे मध्यरात्री स्वागत
धुळे दौरा आटोपून मुंबईकडे परतणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे गुरुवारी मध्यरात्री द्वारका चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. नियोजित दौऱ्यानुसार पटोले हे शनिवारी नाशकात येणार होते. मात्र अचानक त्यांचा दौरा रद्द करण्यात आला व धुळे येथून ते मोटारीने मुंबईकडे रवाना झाले. शहराध्यक्ष शरद आहेर, हनिफ बशीर, बबलू खैरे, उद्धव पवार, स्वप्नील पाटील, समीना पठाण, दाऊद शेख, नदीम शेख, रूबीना खान आदींनी त्यांचे स्वागत केले.