नाशिक : पक्षांतर्गत मतभेद असू नयेत यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो; पण सर्व पक्षांमध्ये काही प्रमाणात मतभेद असतात. तसे भाजपातही असले तरी पक्षात संघटनात्मक फेरबदल होणार नसल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
भाजप प्रदेशाध्यक्षांचे शुक्रवारी रात्री आगमन झाल्यानंतर शनिवारी सकाळपासूनच पक्षाच्या विविध बैठकांचे सत्र दिवसभर रंगले. या बैठकांमध्ये शहराच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी तसेच मंडल पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा तसेच भविष्यातील कामांच्या नियोजनाची माहिती घेतली. मात्र, पक्षामध्ये गत काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कुरबुरी तसेच नगरसेवकांच्या अंतर्गत गटबाजीबाबत नगरसेवकांची स्वतंत्र बैठक किंवा असंतुष्ट गटासमवेत स्वतंत्र चर्चादेखील केली नाही. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्षांनी संघटनात्मक फेरबदल होणार नसल्याचे सांगितल्याने जिल्ह्यातील विद्यमान कार्यकारिणीने सुटकेचा नि:श्वास सोडला. माध्यमांशी सविस्तर संवाद रविवारच्या पत्रकार परिषदेतच साधला जाणार असून, त्यावेळी सविस्तर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरात काही प्रमाणात असलेले पक्षीय स्तरावरील मतभेद मिटविण्याचे काम नेहमीच सुरू असते, किंबहुना पक्षात मतभेद नसावेत असेच आमचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इन्फो
संघटनेपेक्षा कुणीही मोठे नसते
पक्षात काही नगरसेवक नाराज आहेत का, या प्रश्नावर बोलताना नाराजीनाट्य सुरूच असते. कोणत्याही पक्षाचे मोठे नेते हे नाराजी दूर करण्यासाठीच येत असतात. मात्र, संघटनेपेक्षा कुणीही मोठे नसते, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे, असे सांगत एकप्रकारे नाराज गटाला टोला लगावला.
इन्फो
निर्बंधांमध्ये हवी शिथिलता
राज्यात कोरोना कमी होत असताना निर्बंधांमध्ये शिथिलता देणे आवश्यक आहे. विशेषत्वे हातावर पोट असणाऱ्यांची स्थिती फारच वाईट असून, अजून स्थिती बिघडू नये, यासाठी राज्य शासनाने लवकरात लवकर निर्बंधांमध्ये अजून शिथिलता आणणे आवश्यक असल्याचेही पाटील यांनी सांगितले.