शहरासह जिल्ह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. पोलीस आयुक्तालयासह पोलीस अधीक्षक कार्यालयानेसुद्धा राज्य राखीव दलाची एक कंपनीचा अतिरिक्त बंदोबस्त मागविला आहे. त्यानुसार एसआरपीच्या जवानांना राष्ट्रीय महामार्गासह राज्यमार्ग व बाजार समित्यांमध्ये तैनात करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा वणवा दिल्लीहून संपूर्ण देशभरात पसरला आहे. दरम्यान, भारत बंद आंदोलनकर्त्यांनी पुकारला असून, त्यांच्या या हाकेला विविध राजकीय पक्ष, संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. शहरात ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेली राज्य राखीव दलाची एक कंपनी तळ ठोकून आहे. यासह शहर पोलीस आयुक्तालयाचा स्ट्रायकिंग फोर्स, जलद प्रतिसाद पथकांसह सुमारे पाचशे पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार असल्याची माहिती परिमंडळ-१चे उपायुक्त अमोल तांबे यांनी दिली. तसेच परिमंडळ-२मधील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोख बंदोबस्त आणि पेट्रोलिंगचे आदेश देऱ्यात आले आहे. विनापरवाना जर कोणीही आंदोलन केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. राज्य राखीव दलाचे सुमारे ३० ते ३५ जवान परिमंडळ-२साठी उपलब्ध झाले आहे. यासह स्ट्रायकिंग पोलीस दलालाही ‘ॲलर्ट’वर ठेवण्यात येणार असल्याचे उपायुक्त विजय खरात यांनी सांगितले.
महामार्गांवरील वर्दळीच्या मुख्य चौकांसह ठिकठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात येणार आहे. कुठल्याहीप्रकारे रहदारीला अडथळा होईल, असे कृत्य कोणी केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. स्वयंस्फूर्तीने जर कोणी आपला दैनंदिन व्यवसाय बंद ठेवत असेल तर हरकत नाही; मात्र जर कोणी बळजबरीने व्यवसाय बंद ठेवण्यास भाग पाडले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
----कोट---
ग्रामीण भागात कुठल्याहीप्रकारच्या निदर्शनांना परवानगी देण्यात आलेली नाही. सर्वच बाजार समित्यांसह महामार्गांवरील वर्दळीच्या चौकांवर चोख बंदोबस्त व पेट्रोलिंग राहणार आहे. कायद्याचा भंग कुठल्याहीप्रकारे जर कोणी करण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. राज्य राखीव दलाची एक प्लॅटूनचा अतिरिक्त बंदोबस्तही सज्ज ठेवण्यात आला आहे.
- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक