नाशिक : कोरोना नियंत्रणासाठी राज्य शाससाने निर्बंध अधिक कठोर केले असून काही आस्थापना बंद तर काहींवर वेळेचे निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात शासनाचे आदेश जसेच्या तसे लागू असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील बार, हॉटेल्स, सलून, जीम बंद राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांना वेळेचे निर्बंध पाळावे लागणार आहेत. असे असले तरी अनेक दुकानदारांमध्ये संभ्रमावस्था आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध अधिक कठोर करण्याचे जाहीर केले आहे. त्याबरोबरच शनिवार आणि रविवार पूर्णपणे बंदची घोषणा केलेली आहे. राज्य शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आस्थापनांना दिलेले आहेत. जिल्ह्यात यापूर्वीही निर्बंध लागू करण्यात आलेले होते. आता अधिक कठोर अंमलजबावणी केली जाणार आहे. जीवनाश्यक वस्तूंवी दुकाने वगळता रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
गर्दी होणारी दुकाने आणि आस्थापनांनर निर्बंध आणण्यात आलेले आहेत. गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच सुरक्षितता नियमांचे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. नागरिकांची गर्दी होणारी दुकाने तसेच क्लब बंद करण्यात आलेल्या आहेत. येत्या ३० तारखेपर्यंत याबाबतचे आदेश सर्वांना लागू असणार आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था, संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्या विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे.
--इन्फो--
कर्मचाऱ्यांचे लसीकरण महत्त्वाचे
दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी यांचे लसीकरण संबंधित दुकानमालकाने करण्याच्या सूचना शासनाच्या आदेशात देण्यात आलेल्या आहेत. बांधकामावरील मजूर, कंपनी कामगार यांचे लसीकरण करण्याला प्राधान्य देण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आहे. शक्यताे कामाच्या ठिकाणी सुरक्षितता नियमांचे पालन करून कामगारांच्या राहण्याची आणि जेवणाची देखील सोय करावी असेही आदेशात म्हटलेले आहे.
--इन्फो--
जीवनावश्यक वगळता सर्व दुकाने बंद
जीवनावश्यक सोडून सर्व दुकाने, मॉल्स, मार्केट बंद राहणार असल्याचे अधिसूचनेत आगोदरच स्पष्ट करण्यात आलेले आहे. जीवनाश्यक सेवेतील दुकानदारांनीदेखील ग्राहकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे कळविण्यात आले आहे. दुकानदारांनी आपल्या कामगारांचे लसीकरण करवून घ्यावे.
--इन्फो--
या आहेत अत्यावश्यक सेवा
१) हॉस्पिटल्स, डायग्नोस्टिक सेंटर्स, क्लिनिक्स, मेडिकल, इन्शुरन्स ऑफिसेस, फार्मसी, वैद्यकीय सेवा, किराणा माल, भाजीपाला दुकाने, बेकरी, फूड शॉप, सार्वजनिक वाहतूक, ट्रेन, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बसेस, मालवाहतूक, शेती विषयक सेवा यांचा समावेश आहे.