चांदवड : तालुक्यातील गंगावे येथील संत जनार्दन स्वामी विद्यालयातील विद्यार्थी ओम विलास शेलार याने विज्ञान शिक्षक जी.एन. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बॉटल ट्री गार्ड हे उपकरण तयार करून संदीप फाउण्डेशन नाशिक येथे आयोजित इन्स्पायर अवॉर्ड योजनेंतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शनात सादर केले. त्यांच्या या उपकरणांची राज्य स्तरावर निवड झाली आहे.एकच लक्ष पन्नास कोटी वृक्ष ही संकल्पना घेऊन, टाकून दिलेल्या वस्तूपासून अतिशय उपयुक्त व परिणामकारक उपकरण तयार केले आहे. मागील दोन वर्षे नाशिक जिल्ह्यात ७८ लाख झाडे लावली; पण संगोपनाअभावी २५ लाख झाडे मृत पावली. शासनाचे साडेबारा कोटीरुपये वाया गेले. ही बाब लक्षात घेऊन फेकून दिलेल्या पाणी बॉटल, सलाइन बॉटल, बांबूचे तुकडे, सुतळी व तारा अशा वस्तू कमी खर्चात जमा करून हा गार्ड तयार केला आहे. त्याचे अनेक फायदे आहेत प्लॅस्टिक-कचरा प्रदूषण थांबणार आहे. झाडांना किमान २५ दिवस पुरेल इतके पाणी बॉटल ठिबकने मिळणार आहे. केवळ १५० रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. यातून नवीन रोजगार उपलब्ध होणार आहे.विद्यार्थी ओम विलास शेलार व जी.एन. गायकवाड यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेलार, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक व्ही. के. सोनवणे, पर्यवेक्षक आर. जी. जेजूरकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतरकर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी स्वागत केले.