रस्ता दुरुस्तीची मागणी
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील वावी-दुशिंगपूर- सायाळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. ओझर विमानतळ ते शिर्डी विमानतळ हा रस्ता नव्याने बनविण्यात आला होता. त्यामुळे सदर रस्ता चांगला झाला होता. मात्र समृद्धी महामार्गाच्या कामावर असलेल्या अवजड वाहनांनी या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
खंडित वीजपुरवठ्याने त्रस्त
सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागात गेल्या आठवड्यापासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी व व्यावसायिकांची अडचण निर्माण होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना रब्बीचे नियोजन करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे, तर व्यावसायिकांना आपला व्यवसाय करताना विजेचे नियोजन पाहून पुढील नियोजन करावे लागत आहे.
रोजगार हमी योजनेतून होणार शाळांची भौतिक कामे
सिन्नर : राज्य शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांचा भौतिक विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील रिकाम्या हातांना काम मिळण्यासोबतच शाळा व अंगणवाड्यांमध्ये भौतिक सुविधा पुरवून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्याचे दुहेरी उद्दिष्ट पूर्ण होईल.
प्रहार जनशक्ती पक्षाची आढावा बैठक
सिन्नर : प्रहार जनशक्ती पक्षाची आढावा बैठक येथील शासकीय विश्रामगृहावर पार पडली. शरद शिंदे हेच प्रहारचे तालुकाध्यक्ष कायम राहतील व त्यांनी जाहीर केलेली कार्यकारिणीच ग्राह्य असेल, असे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांनी सांगितले. पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जावेदभाई, जिल्हा सरचिटणीस नितीन गवळी यांच्यासह दत्ता आरोटे उपस्थित होते.
६१८ अपात्र लाभार्थींकडून ६२ लाखांची वसुली
सिन्नर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची नोव्हेंबरअखेर तालुक्यातील ६१८ अपात्र लाभार्थींकडून ६२ लाख ८० हजार रुपयांची वसुली करण्यात आली. अद्याप एक कोटी ९० लाख रुपयांची वसुली करणे बाकी आहे. या अपात्र लाभार्थींना पुरेसी संधी देऊनही शासनास रक्कम जमा करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या अपात्र लाभार्थींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे संकेत तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिले.