नाशिक : आदिवासी विकास विभागातील सफाई कामगारांचे एक वर्षापासून थकलेले वेतन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अपर आयुक्त, गिरीश सरोदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
राज्यात मार्च २०२० मध्ये कोविड-१९ संसर्गजन्य महामारीसारख्या गंभीर परिस्थितीतदेखील आदिवासी विकास विभागात वसतिगृह व आश्रम शाळा येथे सफाईच्या कामासाठी नियुक्त गरीब आदिवासी सफाई कामगार कर्मचाऱ्यांनी साफसफाईचे काम नित्यनियमाने केले. कोणत्याही परिस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन रोखू नये, असे शासनाचे आदेश असतानाही आदिवासी विकास विभागाने जाणीवपूर्वक तब्बल एक वर्ष थकविलेल्या पगारामुळे या कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. असे निवेदनात म्हटले आहे.या प्रसंगी शहराध्यक्ष अंकुश पवार, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, मनविसे शहराध्यक्ष संदेश जगताप, मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभाग शहराध्यक्ष सिद्धेश सानप, मनविसे जिल्हा सरचिटणीस अक्षय कोंबडे आदी पदाधिकारी व मनविसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.