सायखेडा : राज्यातील गत तीन वर्षांपासून बंद असलेली पोलीसभरतीची सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी, यासाठी तपस्या फोरम आणि युवक यांच्या वतीने सायखेडा पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक आशीष अडसूळ यांना निवेदन देण्यात आले.गेल्या तीन वर्षांपासून राज्यात पोलीसभरती रखडलेली आहे. दोन सरकारे बदलली पण पोलीसभरतीला मुहूर्त सापडेना. पोलीसभरती हा ग्रामीण युवकांसाठी सर्वात मोठा रोजगार असतो. तीन वर्षांपासून भरतीच्या एकापाठोपाठ केवळ घोषणांमुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.पोलीसभरती हा केवळ रोजगार नसून गोरगरिबांच्या जगण्याचे साधन आहे. त्यांच्या भावनेचा सरकारने आदर करावा. नोकरी नाही, शेतमालाला भाव नाही, अशा विवंचनेत तरुण सापडलेला आहे.यासंदर्भात पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले.सरकारने वाढती बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणा आणि कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेले उद्योगधंदे यांचा परिपाठ पाहता युवक आणि गोरगरिबांच्या भावनेचा आदर करीत पोलीसभरती तत्काळ सुरू करावी. तीन वर्षांत ज्यांचं वय वाढलं त्यांना एक संधी द्यावी व भरती प्रक्रिया स्पष्ट करावी.- किरण सानप, अध्यक्ष, तपस्या फोरम.