नाशिक : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नाशिककरांनी दिलेले दान भरून पावले आणि तब्बल दोन लाख ७१ हजार विसर्जित गणेशमूर्तींचे दान पालिका आणि सहयोगी संस्थांना प्राप्त झाले, असा दावा महापालिकेने केला असला तरी, नाशिकची लोकसंख्या आणि त्यातही गणेश प्रतिष्ठापना करण्याची संख्या याचे गुणोत्तर पाहिले तर हा दावाच शंकेला कारणीभूत ठरणारा आहे. त्यामुळे महापालिकेकडून अशा प्रकारची दिशाभूल कशासाठी असा प्रश्न निर्माण झाल्यावाचून राहत नाही.पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाअंतर्गत सुरुवातीला काही सेवाभावी संस्था आणि नंतर नाशिक महापालिकेसारख्या निमशासकीय संस्थांनी पुढाकार घेतला. त्यामुळे धार्मिकता जोपासतानाच पर्यावरणाचे भान राखणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तींचे नदीपात्रात विसर्जन करण्याऐवजी औपचारिकता म्हणून नदीपात्रात बुडवलेली मूर्ती स्वयंसेवी संस्था म्हणजेच पर्यायाने पालिकेकडे दिली जाते. पालिकाच या मूर्तींचे उत्तरदायित्व स्वीकारते. दिवसेंदिवस पालिकेच्या आवाहनाला साथ मिळावी म्हणून कृत्रिम कुंडांची संख्याही वाढत आहे. त्याचाच फायदा पालिकेला झाला आणि यंदा २ लाख ७१ हजार ३८६ मूर्तींचे दान पालिकेला मिळाले म्हणजे इतक्या मूर्ती नदीपात्रात जाण्यापासून वाचल्या, असा दावा पालिकेने केला आहे. खासगी स्वयंसेवी संस्थांनी स्वीकारलेल्या मूर्ती दानाचे आकडे बघितले तर मूर्ती दानाची ही संख्या तीन लाखांपेक्षा अधिक होऊ शकेल, तथापि, त्याला आधार नाही म्हणून तूर्तास पालिकेने दिलेली आकडेवारी मान्य केली आणि आत्तापर्यंतचा मूर्ती दान स्वीकारण्याचा एक विक्रम मानला तरी त्यातून अनेक शंका निर्माण होतात.२०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार नाशिक महापालिका हद्दीतील लोकसंख्या १४ लाख ८६ हजार ०५३ इतकी आहे. त्यात हिंदू धर्मीयांची संख्या १२ लाख ६६ हजार २०७ इतकी आहे. असे सरकारचेच आकडे आहेत. हिंदंूचे एक कुटुंब चार माणसाचे आहे, असे धरले तर हिंदू कुटुंबीयांची एकूण घरे तीन लाख होतात. सामान्यत: घरात एकच गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करतात. त्याचा विचार केला तर तीन लाख म्हणजे शंभर टक्के घरांमध्ये गणपती बसतात, असे मानायचे काय, पालिकेला दोन लाख ७१ हजार मूर्तींचे दान मिळाले असल्याचा दावा आहे, परंतु अनेक घरांमध्ये गणपती दहा दिवस नसतात. काही घरांमध्ये दीड दिवसाचा, तर काहींकडे तीन, पाच आणि सात दिवस गणपती असतो. अनेक कुटुंबांमध्ये तर गौरीच्या पाठवणीबरोबरच गणपतीचे विसर्जन होते. मग, त्यांचे काय झाले, त्यांची आकडेवारी एकत्र केली, तर शंभर टक्के घरांमध्ये गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती, असा अर्थ निघू शकतो. मुळात शंभर टक्केघरात गणेश प्रतिष्ठापना होत नाही ही वस्तुस्थिती आहे. इतकेच नव्हे तर काही मूर्तींचे अनंत चतुर्दशीपूर्वी विसर्जन होते याचा विचार केला, तर ही पालिकेची आकडेवारी निखालस फसवी असल्याचेच स्पष्ट होते.
मूर्ती दानाची आकडेवारी शंकास्पद
By admin | Published: September 30, 2015 12:11 AM